एकही आश्वासन पूर्ण न करणारे सरकार- राधाकृष्ण विखे-पाटील

By admin | Published: July 15, 2016 08:39 PM2016-07-15T20:39:03+5:302016-07-15T20:39:03+5:30

नवनवीन आश्वासने देऊन एकापेक्षा एक लोकप्रिय घोषणा करत असले तरी अद्यापपर्यंत एकही आश्वासन त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत पाळलेले नाही

Radharakrishna Vikhe-Patil, a non-fulfillment government | एकही आश्वासन पूर्ण न करणारे सरकार- राधाकृष्ण विखे-पाटील

एकही आश्वासन पूर्ण न करणारे सरकार- राधाकृष्ण विखे-पाटील

Next

ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. 15 - राज्यातील फडणवीस सरकार दररोज नवनवीन आश्वासने देऊन एकापेक्षा एक लोकप्रिय घोषणा करत असले तरी अद्यापपर्यंत एकही आश्वासन त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत पाळलेले नाही. पंढरपूरसाठी नमामि चंद्रभागा विकास प्राधिकरणांतर्गत अनेकदा त्यांनी शेकडो कोटीच्या घोषणा केल्या. मात्र निधीची वानवा असल्याने ती कामे पूर्ण होत नाहीत. अशा सरकारला पावसाळी अधिवेशनात घेरणार असल्याची घोषणा विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
पंढरपूर आषाढी महापूजेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील पंढरपूरला आले होते. कॉँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजयसिंह, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आ. भारत भालके, उल्हास पवार, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे आदी उपस्थित होते. सध्या राज्यात भीषण दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्हे दुष्काळाने उद्ध्वस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफी, फळबाग अनुदान आदी प्रकारच्या मदतीत सरकारने सरसकट शेतकऱ्यांना करणे गरजेचे होते. मात्र हे सरकार झोपेचे सोंग घेत असून निम्म्या शेतकऱ्यांना लाभ तर अर्धे शेतकरी उपाशी असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे.
पश्चिम महाराष्ट्र वगळता विदर्भ व राज्यातील अन्य काही भागात दमदार पाऊस झाला आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते मुबलक प्रमाणात मिळणे गरजेचे होते. मात्र त्याठिकाणी बियाणे व खतांचा काळाबाजार सुरू आहे. याकडेही सरकारचे दुर्लक्ष आहे. सध्याच्या फडणवीस सरकारमध्ये भ्रष्टाचारात गुंतलेले अनेक मंत्री आहेत. पंकजा मुंढे, जयकुमार रावळ, निलंगेकर आदी मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काहींची सीबीआय चौकशी सुरू आहे, तरीही त्यांना मंत्रीमंडळात स्थान कसे दिले जाते, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले पाहिजे. या सरकारवर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा ताशेरे ओढत त्यांच्या काही घोषणा रद्द करण्यास भाग पाडले आहे. तरीही ते घोषणा करण्याचे थांबत नाहीत. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टिकाही विरोधीपक्ष नेते विखे-पाटील यांनी केली.
-----------------------------
भ्रष्टाचाराचे प्रदर्शन भरविणार
फडणवीस सरकारमधील जून्या मंत्र्यांनी अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे. त्याचे सविस्तर पुरावे आपल्याकडे आहेत. तर नवीन समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांनीही मंत्रीमंडळात येण्यापूर्वीच भ्रष्टाचार केला आहे. त्याचेही पुरावे आपल्याकडे आहेत. त्याचे पुरावे राज्य सरकारला वेळोवेळी देऊनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी अशा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे एक प्रदर्शन आपण भरविणार आहोत. या प्रदर्शनात या मंत्र्यांच्या विरोधातील सर्व पुरावे, जनतेसाठी खुले ठेवणार आहोत, अशी माहितीही विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
---------------------------
पंढरपूरसाठी केलेल्या घोषणा फसव्या
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सर्व कामे लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली. त्यासाठी अनेकदा शेकडो कोटींच्या घोषणा केल्या. आता नमामि चंद्रभागा, तुळशी वृंदावनसारख्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंढरपुरात येऊन केल्या. मात्र यामधील किती योजनांना सरकारने भरीव निधी उपलब्ध केला, हे सांगणे सरकारला शक्य नाही. यासारख्या अनेक घोषणा करून फडणवीस सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंढरपूरसाठी भविष्यात भरीव निधीची उपलब्धता करावी व सर्व कामे मार्गी लागावीत, यासाठी विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

Web Title: Radharakrishna Vikhe-Patil, a non-fulfillment government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.