राज्यभरातील रेडिओलॉजिस्ट बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 10:20 PM2016-06-20T22:20:36+5:302016-06-20T22:20:36+5:30
कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर काम न करणाऱ्या रेडिओलॉजिस्टवर होत असलेल्या कारवाईविरुद्ध रेडिओलॉजिस्ट असोसिएशनने संपाचे हत्यार उपसले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.२० - कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर काम न करणाऱ्या रेडिओलॉजिस्टवर होत असलेल्या कारवाईविरुद्ध रेडिओलॉजिस्ट असोसिएशनने संपाचे हत्यार उपसले आहे. गेले सात दिवस पुण्यात सुरु असलेल्या बेमुदत संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सोमवारपासून २ हजार रेडिओलॉजिस्ट संपात सहभागी झाले आहेत. संपाच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून आपत्कालीन स्थितीत खासगी रुग्णालयात चाचण्या केल्या जात आहेत.
राज्यातील बहुतांश रेडिओलॉजिस्ट हे कायदेशीर पद्धतीने काम करत आहेत. पण, काहीवेळा एफ फॉर्म भरताना एखाद दुसरा रकाना राहतो, काहीवेळा रुग्ण चुकीची माहिती देतात, ती माहिती भरली गेल्यास रेडिओलॉजिस्टवर कारवाईचा बडगा उचलला जातो. अनेकदा सबळ पुरावे हातात नसतानाही मशीन सील केले जाते. त्यामुळे रेडिओलॉजिस्टचे नुकसान होते. तीन तीन महिने मशीन बंद राहिल्यास आर्थिक संकट या रेडिओलॉजिस्टवर येते. त्यामुळे अशापद्धतीने होणारी कारवाई थांबावी या प्रमुख मागणीसाठी संप पुकारल्याचे रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी सांगितले.
पुण्यातील रेडिओलॉजिस्ट डॉ. आशुतोष जपे यांच्या सेंटरवर कारवाई करण्यात आली. पण, त्यांच्याविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे पुणे महानगरपालिकेच्या हातात नाहीत. सोमवारी दुपारी पुणे महापालिकेच्या आयुक्तांची संघटनेच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यासंदर्भात चौकशी केली जाईल, इतकेच महापालिकेकडून सांगण्यात आले. याविरुद्ध कोणतेही ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे हा संप सुरुच राहणार असल्याचेही डॉ. ठक्कर यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील अनेक रेडिओलॉजिस्ट हे भीतीच्या छायेत जगत आहेत. कारण, कोणत्या क्षणी कारवाई होईल याचा नेम नाही. त्यामुळे आता यावर ठोस निर्णय घेतला जावा, ही आमची मागणी आहे. त्यासाठी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
- राज्यात २ हजार रेडिओलॉजिस्ट संपावर
- मुंबई, पुण्यात सुमारे १ हजार रेडिओलॉजिस्ट
- सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एक्सरे सेवा बंद राहणार
- दिवसाला एका रेडिओलॉजिस्टकडून १५-२० चाचण्या