राज्यातील रेडिओलॉजिस्ट आज संपावर
By admin | Published: June 14, 2016 03:23 AM2016-06-14T03:23:25+5:302016-06-14T03:23:25+5:30
रेडिआॅलॉजिस्टने लिंगनिदान चाचणी केल्याचे कोणतेही सबळ पुरावे नसताना, रेडिलॉजिस्ट, सोनोग्राफी तज्ज्ञांचे मशीन सील करण्याचे प्रकार होत आहेत. याला विरोध करण्यासाठी इंडियन
मुंबई : रेडिआॅलॉजिस्टने लिंगनिदान चाचणी केल्याचे कोणतेही सबळ पुरावे नसताना, रेडिलॉजिस्ट, सोनोग्राफी तज्ज्ञांचे मशीन सील करण्याचे प्रकार होत आहेत. याला विरोध करण्यासाठी इंडियन रेडिओलॉजीकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशनने सोमवारी एक दिवसीय राज्यव्यापी संप पुकारला आहे. पुण्यात हा संप बेमुदत असणार आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णांच्या चाचण्या करणार असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत लिंगनिदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई केली जाते. पण, प्रत्यक्षात आॅनलाईन फॉर्म अपूर्ण भरला गेल्याच्या स्थितीतही अनेकदा कारवाई होताना दिसते, असे रेडिओलॉजिस्ट्सचे म्हणणे आहे. त्यामुळे कायद्यात आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी असोसिएशनचे राष्ट्रीय पीसीपीएनडीटी समन्वयक डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत केली. पुण्यातील रेडिओलॉजिस्ट डॉ. आशुतोष जपे यांनी एका गर्भवतीची १९ फेब्रुवारीला सोनोग्राफी केली होती. गर्भाच्या मणक्यात दोष असल्याचे आढळले. महिलेने गर्भपात करुन घेतला. हा गर्भ मुलीचा होता. महापालिकेच्या टीमने ५ एप्रिलला डॉ. जपे यांच्या सेंटरमधील अल्ट्रासाऊंड मशीन ५ तास तपासणी करून सील केले. त्यावेळी ‘एफ’ फॉर्ममधील दोन चुका त्यांनी दाखवल्या. त्यानंतर कारवाई केल्याचे डॉ. ठक्कर यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
रेडिओलॉजिस्टच्या मागण्या
निर्दोष डॉ. जपे यांच्यावरील आरोप काढून टाकावा.
डॉ. जपे यांच्या मशीनचे सील काढावे.
पुणे महापालिकेतील दोषींवर कारवाई करावी.
२ हजार रेडिओलॉजिस्ट संपावर
मुंबई, पुण्यात सुमारे १ हजार रेडिओलॉजिस्ट संपावर.
सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एक्सरे सेवा बंद राहणार
दिवसाला एका रेडिओलॉजिस्टकडून १५-२० चाचण्या
खासगी, शासकीय रुग्णालयांत भेद का?
खासगी सोनोग्राफी सेंटर आणि रुग्णालयांवर कागदपत्रांची पूर्तता न केल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली जाते. पण, शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयांकडून अशा चुका अनेकदा होतात. पण, या शासकीय सेंटरविरुद्ध कारवाई होताना दिसत नाही. हा भेद का? असा सवालही असोसिएशनने केला आहे.
डॉ. जपे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे रेडिओलॉजिस्टमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी संप पुकारल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले.