रेडिओलॉजिस्टचे आंदोलन पेटले
By Admin | Published: June 16, 2016 09:43 PM2016-06-16T21:43:51+5:302016-06-16T21:45:58+5:30
रेडिओलॉजिस्टने पुकारलेल्या बंदला शहरातील कॉर्पोरेट हॉस्पिटल्सनेही गुरुवारी पाठिंबा दिला.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 16 - रेडिओलॉजिस्टने पुकारलेल्या बंदला शहरातील कॉर्पोरेट हॉस्पिटल्सनेही गुरुवारी पाठिंबा दिला. शहरातील या सर्व हॉस्पिटलमधील इमर्जन्सी सोनोग्राफी बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे आजपासून ओपीडीमध्ये आलेल्या रुग्णांची सोनोग्राफी करणेही बंद केले. मात्र रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची सोनोग्राफी आणि एक्स रे करण्याचा निर्णय आज रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.
पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत सर्वाधिक गुन्हे राज्यात पुण्यातील डॉक्टरांवर दाखल करण्यात आले आहेत. या कायद्यातील तरतुदी जाचक असून त्यात सुधारणा व्हावी अशी मागणी वारंवार केली असूनही कायद्यात बदल करण्यात येत नाही. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णसेवा करणे अशक्य झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील सोनोग्राफी,एक्य रे सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या संपाला पाठिंबा देण्यासाठी कापोर्रेट हॉस्पिटल्सनेही इमर्जन्सी सोनोग्राफी बंद केल्या आहेत, अशी माहिती इंडियन्स रेडिओलॉजि अँड इमेजिंग असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. गुरूराज लच्छान यांनी दिली.
रेडिओलॉजिस्टच्या संपाला आयएमए, अस्थिरोग तज्ज्ञ संघटना, भूलतज्ज्ञ ांची संघटना आणि शहरातील स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले.
गुरुवारी झालेल्या या बैठकीला शहरातील सर्व कार्पोरेट हॉस्पिटल्सचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पुण्यात सुरू असलेल्या रेडिओलॉजिस्टच्या संपाचा आज तिसरा दिवस होता. सोमवारपर्यंत या कोंडीतून मार्ग निघाला नाही तर पुन्हा राज्यव्यापी बंद पुकारण्याचा इशाराही डॉ. लच्छान यांनी दिला.