Maharashtra Election 2019 : राफेलचे पूजन ही अंधश्रद्धा नव्हे, तर श्रद्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 05:50 AM2019-10-15T05:50:27+5:302019-10-15T05:51:04+5:30
राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन : भाजपची सुपरसॉनिक घोडदौड सुरू असल्याचा दावा
मीरा रोड : पॅरिसमध्ये राफेल विमानाची पूजा करणे, ही अंधश्रद्धा नसून त्यामध्ये आपण कोणतीही चूक केलेली नाही. विजयादशमीला शस्त्रांची पूजा करणे, ही आपली परंपरा असून आपण त्याचेच पालन केले, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी मीरा रोड येथील भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारसभेत केले.
राजनाथ सिंह म्हणाले की, आपण दरवर्षी विजयादशमीला शस्त्रांची पूजा करतो. यावेळी पॅरिसला असल्याने तेथे शस्त्रे कुठे मिळणार? पण, राफेलसारखे सर्वात मोठे शस्त्र समोर असल्याने त्याचीच पूजा करण्याचा विचार मनात आला. त्यामुळे आपण विमानावर ‘ओम’ ही अक्षरे लिहिली. टायरपाशी लिंबे ठेवली, यात अंधश्रद्धा नसून ती आपली श्रद्धा आहे. ‘ओम’ला सर्वजण मानतात व स्मरण करतात, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी जेव्हा आत्मघातकी हल्ला करून ४० जवान शहीद केले, त्यावेळी जर आपल्याकडे राफेल असते, तर आपण त्याच दिवशी पाकिस्तानला नेस्तनाबूत केले असते, असे ते बालाकोट हल्ल्याचा उल्लेख करून बोलले. पॅरिसमध्ये जेव्हा राफेलमध्ये बसलो, तेव्हा सोबत फक्त वैमानिकच होता. राफेल ज्या वेगाने उडाले, तो अनुभव चिरकाल स्मरणात राहील, असा रोमहर्षक होता. या निर्णयाचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना देईन, असे राजनाथ म्हणाले.
भाजप आज राफेलसारखा सुपरसॉनिक वेगाने उडत असून त्याच गतीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस खाली जात आहे, असे सांगून राजनाथ म्हणाले की, काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम आम्ही हटवून दाखवले. आमच्या काळात कुठेही दंगली झाल्या नाहीत. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा, तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्याचा विकास झाला आहे. भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यावर पुन्हा फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता, महापौर डिम्पल मेहता उपस्थित होते.
उत्तर भारतीयांच्या समर्थनासाठी राजनाथ मुंबईत
मुंबई : उत्तर भारतीयांना एकत्र करत त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला मदत करावी, या उद्देशाने केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह मुंबईत दाखल झाले. ‘लोकांचा उत्साह पाहता त्यांनी विद्या ठाकूर यांनाच विधानसभेत निवडून देण्याचे नक्की केले आहे, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. तर चारकोपमध्ये योगेश सागर यांच्या सभेतही त्यांनी ‘प्राण जाये पर वचन न जाये’ या शब्दांत भाजप सरकार त्यांनी दिलेली वचने नक्की पूर्ण करेल, असे आश्वासन दिले. कार्यक्रमास खा. गोपाळ शेट्टी, रामदास आठवले, योगेश सागर, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, महामंत्री अमरजीत मिश्रा तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.