राहुल गांधींना न्यायालयात खेचणार - रणजीत सावरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:27 AM2019-12-16T06:27:41+5:302019-12-16T06:27:43+5:30
रणजीत सावरकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली नाही, केवळ काही अटी मान्य केल्या, हे जगजाहीर असतानाही खोटे विधान करून त्यांची बदनामी केली आहे.
मुंबई : ‘माफी मागायला माझे नाव राहुल सावरकर नाही,’ असे विधान करणाऱ्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांचे नातू रणजीत सावरकर हे पाच कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार आहेत.
रणजीत सावरकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली नाही, केवळ काही अटी मान्य केल्या, हे जगजाहीर असतानाही खोटे विधान करून त्यांची बदनामी केली आहे. स्वातंत्र्यवीरांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, कोलू ओढला. सावरकरांनी केवळ आपलीच नव्हे, तर अन्य क्रांतिकारकांचीही सुटका व्हावी, यासाठी अर्ज केले होते. कारागृहातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणे, ही केवळ सावरकरच नव्हे, तर सर्वच क्रांतिकारकांची रणनीती होती. सावरकरांप्रमाणेच सगळ्यांनीच सरकारी अटी मान्य करून सुटका करून घेतली व पुढे कामही सुरू ठेवले. सावरकर अंदमानात असतानाच त्यांचा युरोपमधील क्रांतिकारकांशी संपर्क असल्याचा ब्रिटिश गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. तत्कालीन गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी सावरकरांच्या अर्जात कुठलाही खेद अथवा खंत नसल्याचे नोंदवत, सावरकर अत्यंत धोकादायक कैदी असल्यामुळे त्यांना अंदमानात डांबून ठेवणे भाग असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, ब्रिटिशांनी सावरकरांना एकूण १४ वर्षे कारागृहात आणि नंतर १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. असे असतानाही राहुल गांधी हे सावरकर यांच्याविरोधात विधान करून अपमान करत आहेत, असे रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे.
भाजपचा लाँग मार्च
मुंबई : काँग्रेसचे नेता राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपच्या वतीने बोरीवली ते शिवाजी पार्क असा पायी लाँगमार्च काढण्यात आला. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, उत्तर मुंबईचे खा. गोपाळ शेट्टी, उत्तर पूर्व मुंवईचे खा. मनोज कोटक आणि आमदार सुनील राणे यांनी या मार्चचे नेतृत्व केले.