बुधवारी राहुल गांधी भिवंडी कोर्टात
By admin | Published: November 14, 2016 05:39 AM2016-11-14T05:39:35+5:302016-11-14T05:39:35+5:30
खासदार निवडणूक प्रचाराच्या वेळी तालुक्यातील सोनाळे गावातील सभेत महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा.स्व. संघावर टीका केल्याने
भिवंडी: खासदार निवडणूक प्रचाराच्या वेळी तालुक्यातील सोनाळे गावातील सभेत महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा.स्व. संघावर टीका केल्याने, त्यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणीसाठी येत्या बुधवारी राहुल गांधी भिवंडीत येणार आहेत. आदल्या दिवशी म्हणजे, मंगळवारी राहुल गांधी मुंबईत येणार आहेत.
२०१४ साली झालेल्या खासदार निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी भिवंडीत आले होते. सोनाळे येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी संघावर आरोप केला होता. त्याची दखल घेत संघाचे शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात ६ मार्च २०१४ रोजी याचिका दाखल केली. त्या निमित्ताने राहुल गांधी एका तारखेस भिवंडी कोर्टात आले. त्यानंतर, दिल्ली सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या इतर याचिकांसोबत त्यांची सुनावणी झाली. मात्र, या याचिकेतील मुद्दे आणि आरोपामुळे ही याचिका पुन्हा भिवंडी कोर्टात सुनावणीसाठी पोहोचली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनानिमित्ताने दिनांक १५ रोजी मुंबई काँग्रेसच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला असून त्यासाठी राहुल गांधी आदल्या दिवशी रात्री मुंबईत दाखल होणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी ते भिवंडी कोर्टात हजर होणार आहेत, असा कार्यक्रम मुंबई काँग्रेसच्या बैठकीत ठरल्याचे सूत्राने सांगितले. (प्रतिनिधी)