राहुल गांधी आहेत म्हणून उत्सव मंडळाचे फावलेय - उद्धव ठाकरे
By admin | Published: May 18, 2017 07:37 AM2017-05-18T07:37:47+5:302017-05-18T07:37:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तीनवर्षांच्या कारभारावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अत्यंत बोच-या शब्दात टीका केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तीनवर्षांच्या कारभारावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अत्यंत बोच-या शब्दात टीका केली आहे. स्वत: शिवसेनाही केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपा सरकारमध्ये सहभागी आहे. शेअर मार्केट उसळते आहे आणि मेहनत करणारा शेतकरी कोसळतो आहे. शेअर मार्केटवाल्यांचे दोनाचे शंभर होत आहेत आणि शेतक-यांच्या हाती शंभराचे दोनच पडत आहेत. त्यांना न्याय्य हक्कांसाठी, हमी भावासाठी रस्त्यावर यावे लागत आहे.
तूर जाळावी लागत आहे, कांदा फेकून द्यावा लागत आहे. ‘उसळी’ बनविणा-या डाळींसाठी शेतकरी मर मर मरतोय आणि दुसरीकडे शेअर मार्केटमधील ‘उसळी’वर भलतीच मंडळी ताव मारीत आहेत. मग आता शेतकऱ्यांनो, नेहमीच्या बाजारात जाऊ नका, शेअर ‘बाजारा’त जा. पीक नको, शेअर घ्या असे त्यांना सांगायचे का? मटका असलेला शेअर बाजार तुपाशी आणि मेहनत करून देशाला सुजलाम सुफलाम बनविणारा शेतकरी उपाशी हे चित्र देशात आजही कायमच आहे अशा शब्दात उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे.
सत्तेवर येताच पाकिस्तानला धडा शिकवू असे मोदी यांच्या पक्षाचे वचन होते व सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांसाठी ते काँग्रेस राजवटीस दोषी मानत होते. आजचे कश्मीर सीमेवरील चित्र असे आहे की, रोज आमचे जवान शहीद होत आहेत. जवानांची मुंडकी छाटून पाकिस्तानात नेली जात आहेत. जवानांचे अपहरण करून हत्या केल्या जात आहेत. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस दलाचे बळी जात आहेत व सरकार फक्त इशारे देत दिवस ढकलत आहे. फक्त इशारे व हाकारे देण्यासाठीच मोदी यांच्या पक्षाला लोकांनी निवडून दिले काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- ‘अच्छे दिन’ येतील या अपेक्षेनेच जनतेने मोठ्या बहुमताने केंद्रात मोदी सरकार विराजमान केले होते. आम्ही स्वतःदेखील तीन वर्षांपूर्वीच्या या आनंद सोहळ्यात सहभागी झालोच होतो; नव्हे देशाच्या नशिबी हे सरकार यावे म्हणून रान उठवणारे आम्हीच होतो, पण आज देशात गाईंचे प्राण वाचवताना शेतकरी, जवान व जनतेचे मात्र प्राण जाताना आम्ही पाहत आहोत. तीन वर्षांच्या पूर्ततेचा ‘फेस्ट’ साजरा करताना दिलेल्या वचनांची आणि शेतकरी व जवानांच्या हकनाक जाणाऱ्या प्राणांची विस्मृती होऊ नये. समोर राहुल गांधी आहेत म्हणून आपले फावले आहे हे उत्सव मंडळाने समजायला हवे. आम्ही उत्सव मंडळास मनःपूर्वक शुभेच्छा देत आहोत व शेतकरी, जवानांच्या मृतात्म्यांना आदरांजलीचे पुष्पचक्र अर्पण करीत आहोत.
- आपल्या देशात सण आणि उत्सवांना तोटा नाही. दुष्काळात आणि कर्जबाजारीपणातही आपण सण व उत्सव साजरे करीत असतो. त्यामुळे केंद्र सरकारला तीन वर्षे झाली त्याप्रीत्यर्थ देशभरात ‘मोदी फेस्ट’ म्हणजे उत्सव साजरा करण्याचे कुणी ठरवले असेल तर त्यास आक्षेप घेण्याचे कारण नाही. जनता तळमळत असली, शेतकरी आत्महत्या करीत असले व सीमेवर जवानांची बलिदाने चढत्याक्रमाने होत असली तरी उत्सव साजरे करावेत असे ज्यांना वाटते त्यांना देशाचे मन कळले आहे असे वाटत नाही. राजा खुशाल उत्सव साजरा करील, पण त्या उत्सवात प्रजा सामील होणार नसेल तर उत्सवांचा रंग फिका पडेल याची काळजी उत्सव मंडळाने घ्यायलाच हवी. मोदी सरकारला तीन वर्षे झाली. तीन वर्षांपूर्वी याच दिवशी देशात आनंदाचे फटाके फुटले होते व लोकांनी रस्त्यावर येऊन दिवाळी साजरी केली होती. आता सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याचा सोहळा २६ मेपासून २१ दिवस चालणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात या काळात आनंदीआनंदाचे कार्यक्रम साजरे होतील व सरकारी तिजोरीतून त्यावर काही हजार कोटी खर्च होतील. सरकारचा खर्च प्रत्यक्ष विकासकामांवर किती व जाहिरातबाजीवर किती याचा तपशील समजून घेतला पाहिजे. ‘स्वच्छ भारत’ अभियानसारख्या उपक्रमांवर काही हजार कोटी खर्च झाले, पण देश खरंच स्वच्छ झाला काय? गंगा स्वच्छ करण्याचे एक खर्चिक अभियान सुरू आहे व पाणी स्वच्छ होत आहे की सरकारी तिजोरी साफ होत आहे, हा प्रश्न लोकांच्या मनात आजही आहेच.
- सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले तेव्हाही सोहळा झाला. एक वर्ष, दोन वर्षे झाली तेव्हाही सोहळे पार पडले व आता तीन वर्षांचे सरकार झाले म्हणूनही सोहळे होत आहेत. उद्या सरकार सवातीन वर्षांचे होईल तेव्हाही तुम्ही सोहळे साजरे करणार आहात काय? श्रीमान मोदीजी यांचे सरकार सत्तेवर आले ते ‘अच्छे दिन’सारख्या घोषणांची आतषबाजी करून. परदेशातील सर्व काळा पैसा देशात आणू व सर्व हिंदुस्थानी नागरिकांच्या बँक खात्यांवर १५ लाख रुपये जमा करू असे सांगण्यात आल्याने लोकांनी त्या १५ लाखांच्या बदल्यात मते दिली व ही १५ लाखांची आशा अमर असल्याने महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेशपर्यंतच्या विधानसभांच्या निवडणुकाही मोदी यांच्या पक्षाने जिंकल्या, पण या १५ लाखांचा हिशेब अद्यापपर्यंत जमलेला नाही. उलट पंतप्रधान मोदी यांनी ‘नोटाबंदी’चा निर्णय घेऊन लोकांना धक्के दिले. त्या धक्क्यामुळे जनतेचे मेंदू बधिर झाले व काळा पैसा, महागाई, भ्रष्टाचार अशा किरकोळ व्याधींचा लोकांना विसर पडला. सत्तेवर येताच पाकिस्तानला धडा शिकवू असे मोदी यांच्या पक्षाचे वचन होते व सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांसाठी ते काँग्रेस राजवटीस दोषी मानत होते. आजचे कश्मीर सीमेवरील चित्र असे आहे की, रोज आमचे जवान शहीद होत आहेत. जवानांची मुंडकी छाटून पाकिस्तानात नेली जात आहेत. जवानांचे अपहरण करून हत्या केल्या जात आहेत. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस दलाचे बळी जात आहेत व सरकार फक्त इशारे देत दिवस ढकलत आहे. फक्त इशारे व हाकारे देण्यासाठीच मोदी यांच्या पक्षाला लोकांनी निवडून दिले काय? सर्वत्र अराजक व संशयाचे वातावरण आहे.
- वातावरणातील मोकळेपणा व स्वातंत्र्याचा प्रकाश मंद झाला आहे. लोकांचा रोजगार कमी होत आहे. रुपयाचे मोल ढासळत आहे, पण शेअर बाजारातील वाटाणे मात्र तडातडा उडत आहेत. कारण हे वाटाणे व सत्तेतील फुटाण्यांची युती आहे. शेअर मार्केट उसळते आहे आणि मेहनत करणारा शेतकरी कोसळतो आहे. शेअर मार्केटवाल्यांचे दोनाचे शंभर होत आहेत आणि शेतकऱयांच्या हाती शंभराचे दोनच पडत आहेत. त्यांना न्याय्य हक्कांसाठी, हमी भावासाठी रस्त्यावर यावे लागत आहे. तूर जाळावी लागत आहे, कांदा फेकून द्यावा लागत आहे. ‘उसळी’ बनविणाऱया डाळींसाठी शेतकरी मर मर मरतोय आणि दुसरीकडे शेअर मार्केटमधील ‘उसळी’वर भलतीच मंडळी ताव मारीत आहेत. मग आता शेतकऱ्यांनो, नेहमीच्या बाजारात जाऊ नका, शेअर ‘बाजारा’त जा. पीक नको, शेअर घ्या असे त्यांना सांगायचे का? मटका असलेला शेअर बाजार तुपाशी आणि मेहनत करून देशाला सुजलाम सुफलाम बनविणारा शेतकरी उपाशी हे चित्र देशात आजही कायमच आहे. हे चित्र बदलेल, शेतकऱ्याचे मार्केटही ‘उसळी’ मारेल आणि बळीराजाला ‘अच्छे दिन’ येतील या अपेक्षेनेच जनतेने मोठ्या बहुमताने केंद्रात मोदी सरकार विराजमान केले होते. आम्ही स्वतःदेखील तीन वर्षांपूर्वीच्या या आनंद सोहळ्यात सहभागी झालोच होतो; नव्हे देशाच्या नशिबी हे सरकार यावे म्हणून रान उठवणारे आम्हीच होतो, पण आज देशात गाईंचे प्राण वाचवताना शेतकरी, जवान व जनतेचे मात्र प्राण जाताना आम्ही पाहत आहोत. तीन वर्षांच्या पूर्ततेचा ‘फेस्ट’ साजरा करताना दिलेल्या वचनांची आणि शेतकरी व जवानांच्या हकनाक जाणाऱ्या प्राणांची विस्मृती होऊ नये. समोर राहुल गांधी आहेत म्हणून आपले फावले आहे हे उत्सव मंडळाने समजायला हवे. आम्ही उत्सव मंडळास मनःपूर्वक शुभेच्छा देत आहोत व शेतकरी, जवानांच्या मृतात्म्यांना आदरांजलीचे पुष्पचक्र अर्पण करीत आहोत.