सराफांच्या आंदोलनासाठी राहुल गांधी मुंबईत येणार
By admin | Published: April 1, 2016 01:56 AM2016-04-01T01:56:44+5:302016-04-01T01:56:44+5:30
केंद्र सरकारने लावलेल्या १ टक्के अबकारी कराविरोधात बेमुदत बंदची हाक दिलेल्या सराफांच्या लढ्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुढील आठवड्यात
मुंबई : केंद्र सरकारने लावलेल्या १ टक्के अबकारी कराविरोधात बेमुदत बंदची हाक दिलेल्या सराफांच्या लढ्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुढील आठवड्यात ४ किंवा ५ एप्रिल रोजी राहुल गांधी मुंबईला येणार असल्याची माहिती गोल्ड स्मिथ को-आॅर्डिनेशन कमिटी मुंबईचे अध्यक्ष राजाराम देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
अबकारी कराविरोधात गुरूवारी मुंबईत सराफा, स्वर्णकार आणि कारागिर यांच्या १० विविध संघटनांनी एकत्र येत आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. या वेळी माजी खासदार मिलिंद देवरा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आंदोलकांना भेट दिली. देवरा यांनी गांधी यांच्याशी संपर्क साधत ४ किंवा ५ एप्रिल रोजी सराफांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांना आमंत्रित केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. महिनाभर संप पुकारल्यानंतरही केंद्र सरकार अबकारी मागे घेत नसल्याने सरकारला ५ एप्रिलचा अल्टीमेटम देत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. ५ एप्रिलनंतर देशभर मोर्चे काढून सरकारचा निषेध व्यक्त करणारे सराफा रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.