राहुल गांधींना गवसला नवा आत्मविश्वास
By Admin | Published: January 17, 2016 01:35 AM2016-01-17T01:35:39+5:302016-01-17T01:35:39+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही सपाटून मार खाल्ल्याने पार मरगळून गेलेल्या काँग्रेस पक्षात नवी जान फुंकण्याची जबाबदारी पक्षाचे युवा उपाध्यक्ष
- दिनकर रायकर, मुंबई
गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही सपाटून मार खाल्ल्याने पार मरगळून गेलेल्या काँग्रेस पक्षात नवी जान फुंकण्याची जबाबदारी पक्षाचे युवा उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आहे. लवकरच पक्षाच्या नेतृत्वाची धुराही त्यांच्या खांद्यावर येणार आहे. याची पार्श्वभूमी म्हणून सध्या ते विविध राज्यांत जाऊन पक्षनेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. याचाच एक भाग म्हणून शुक्रवार व शनिवारी त्यांनी मुंबईचा दौरा केला.
या दौऱ्यात संपादकांशी गप्पा मारताना राहुल गांधी यांनी केवळ मोदींवर टीका न करता स्वपक्षाच्या चुका आणि उणिवांवरही नेमके बोट ठेवले. ध्येयधोरणे आणि विचारसरणी यात काळानुरूप बदल करण्यात पक्ष कमी पडला, याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. त्यांच्या मते समाजवाद, गरिबी हटाव यासह इतर धोरणांनी काँग्रेसला प्रत्येक वेळी किमान एक दशकासाठी भक्कम पाया मिळवून दिला. संपुआच्या दोन सत्रांमध्येही ‘नरेगा’ योजना व माहिती अधिकार कायद्याने पक्षाला बळकटी दिली. त्यानंतर मात्र समाजाच्या बदलत्या आशा-आकांक्षांचा मागोवा घेण्यात पक्ष मागे पडला व त्याचा परिणाम जनाधार कमी होण्यात झाला, असे विश्लेषण त्यांनी केले. काँग्रेस पक्षात आता ज्येष्ठ, वयोवृद्ध नेत्यांचा पूर्वीप्रमाणे दबदबा व वजन राहिलेले नाही, याचा राहुल गांधींनी इन्कार केला. पक्षात आपण वयाला नव्हे तर गुणवत्तेला अधिक किंमत देतो. त्यामुळे ज्याच्याकडे गुणवत्ता आहे असा कोणत्याही वयाचा नेता व कार्यकर्ता पक्षासाठी सारखाच महत्वाचा आहे, यावर त्यांनी भर दिला.
जीएसटी विधेयक काँग्रेसने अडवून ठेवले, हा सत्ताधाऱ्यांकडून केला जाणारा हेतुपुरस्सर अपप्रचार आहे, असे सांगताना राहुल गांधी म्हणाले, सात वर्षांपूर्वी काँग्रेसनेच या विधेयकासाठी पुढाकार घेतला, त्यामुळे हा कायदा होऊ नये असे काँग्रेसला वाटण्याचा काही कारण नाही. काँग्रेसने या विधेयकात तीन प्रमुख दुरुस्त्या सुचविल्या आहेत. सरकारने त्या मान्य केल्या तर विधेयक विनाविलंब मंजूर करण्याची ग्वाही त्यांनी दिली. खरे तर रा. स्व. संघवाल्यांनाच हे विधेयक नको आहे म्हणून सरकार कांकू करीत आहे व विधेयक अडविल्याचा दोष आम्हाला देत आहे, असे त्यांचे म्हणणे होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकहल्ली कार्यपद्धतीवर टीका करताना राहुल म्हणाले की, बहुमताच्या जोरावर कोणतीही गोष्ट आपण रेटून नेऊ शकू, या भावनेतून मोदींनी सुरुवात केली. पण भूसंपादन विधेयकावर माघार घ्यायला लावून, देश अशा पद्धतीने चालविता येत नाही, हे काँग्रेसने त्यांना दाखवून दिले. मोदींच्या हेकेखोर व एककल्ली कार्यपद्धतीवरील नाराजी त्यांच्याच पक्षाचे नेते व मंत्री खासगीत बोलून दाखवितात, असा शालजोडीतील टोलाही त्यांनी मारला. ‘काँग्रेस दर्शन’ या पक्षाच्या मुखपत्रात पं. जवाहरलाल नेहरु व पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी टिकात्मक मजकूर प्रसिद्ध झाल्याबद्दल त्या नियतकालिकाचे संपादक या नात्याने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना पक्षाने शिस्तभंगाबद्दल कारणे दाखवा नोटिस काढली आहे. त्याविषयी विचारता राहुल गांधी म्हणाले की, निरुपम यांनी मला भेटून चूक मान्य केली व यापुढे अशा चुका होणार नाहीत, अशी ग्वाही दिली. त्यांची नीयत साफ आहे. त्यामुळे माझ्यापुरता तरी हा विषय संपला आहे. परंतु पक्षकार्याची प्रक्रिया म्हणून या नोटिशीवर यथावकाश योग्य ती कारवाई होईल. विशेष म्हणजे मुंबई काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीतच राहुल गांधींनी निरुपम यांना अशा प्रकारे अभय दिले.
काँग्रेस पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सामावून घेणारा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाचे काम कोणा एकाच्या मर्जीनुसार नव्हे तर सर्वांचे विचार घेऊनच केले जाऊ शकते. काँग्रेसची आजवर हिच कार्यपद्धती राहिली आहे व यापुढेही ती तशीच राहील, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे अध्यक्षपद केव्हा स्वीकारणार, असे थेट विचारता राहुल गांधी यांनी स्मितहास्य करून ‘लवकरच’ असे उत्तर दिले.
सर्वांचे म्हणणे ऐकून निर्णय घेण्याकडे कल
कार्यकर्ता मेळावा, पदयात्रा, विद्यार्थ्यांशी मारलेल्या गप्पा किंवा प्रसिद्धी माध्यमांच्या संपादकांशी झालेली दिलखुलास भेट या सर्वांमध्ये एक नवे राहुल गांधी दिसले, अनुभवायला मिळाले. त्यांना गवसलेला नवा आत्मविश्वास त्यांच्या देहबोलीतूनही व्यक्त होताना दिसला. त्यांच्या विचारांत अधिक सुस्पष्टता व ठामपणा जाणवला. संपादकांशी झालेल्या भेटीत ते अगदी ‘रिलॅक्स्ड’ होते. कोणताही प्रश्न न टाळता त्यांनी शांतपणे उत्तरे दिली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेण्याकडे त्यांचा कल असल्याचे जाणवले.