राहुल राजसिंगची नशेत पोलिसांशी हुज्जत
By admin | Published: September 20, 2016 04:47 AM2016-09-20T04:47:32+5:302016-09-20T04:47:32+5:30
‘बालिका वधू’फेम प्रत्यूषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येप्रकरणातील आरोपी व मॉडेल राहुल राजसिंग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
मुंबई : ‘बालिका वधू’फेम प्रत्यूषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येप्रकरणातील आरोपी व मॉडेल राहुल राजसिंग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दारूच्या नशेत वाहन चालवित त्याने रविवारी रात्री सांताक्रुझ येथे पोलिसांशी वाद घातला. त्याच्या सोबत असलेली मैत्रीण सोहनी शर्मा हिनेही कारवाई टाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे काहीकाळ पोलीस ठाण्याच्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला नशेत व विनापरवाना वाहन चालविल्याप्रकरणी अटक करून नंतर जामीनावर सोडण्यात आले.
राहुल राजसिंग हा रविवारी रात्री सोहनी शर्मा हिच्यासमवेत सांताक्रुझ परिसरातून जात होता. वाहतूक पोलिसांची नाकाबंदी करून ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेतर्गंत त्याला अडवून त्याची ‘ब्रेथ अॅनेलायझर’द्वारे तपासणी केली असता मद्याचे प्रमाण अधिक आढळले. त्यामुळे वाहतूक शाखेचे निरीक्षक श्रीकांत देसाई यांनी त्याच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली. मात्र त्याने लायसन्स नसल्याचे सांगत हुज्जत घातली. तर सोहनी शर्मा हिने कारवाई केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू, असे धमकावले. देसाई त्यांना शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतानाही वाद घालत असल्याने त्यांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याठिकाणीही त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
राहुलवर दारू पिऊन वाहन चालवणे, वाहन परवाना न बाळगणे, याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याला नोटीस जारी करून जामिनावर सोडण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते अशोक दुधे यांनी सांगितले. दरम्यान, वादग्रस्त मॉडेल राहुल राजसिंग याला त्याची प्रेयसी व टीव्ही मालिकेतील अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एप्रिलमध्ये अटक झाली होती. याबाबत त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जुलैमध्ये एक मॉडेलचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. (प्रतिनिधी)