Prithviraj Chavan : तोडपाणी करण्यासाठीच छापासत्र; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप; देशात २१ टक्केच लसीकरण, तरीही इव्हेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 06:03 AM2021-10-25T06:03:37+5:302021-10-25T06:04:06+5:30
Prithviraj Chavan : तोडपाणी करण्यासाठीच राज्यात छापासत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करून राज्यात छापे टाकले जात आहेत. यामध्ये खरोखरच जे दोषी असतील त्यांना न्यायव्यवस्था शिक्षा देईल. मात्र, केवळ दहशतीसाठी वापर केला जात असल्याने यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. तोडपाणी करण्यासाठीच राज्यात छापासत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्याचे इव्हेंट (उत्सव) करणे सुरूच आहे. शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याचा डांगोरा ते पिटत असले तरी प्रत्यक्षात देशात २१ टक्केच लसीकरण पूर्ण झाले आहे. दोन डोस घेेतलेले ३० कोटी म्हणजे २१ टक्के लाेक आहेत. उर्वरित ४० कोटी जनतेला एकच डोस मिळाला आहे. चीनने ११० कोटी नागरिकांना दोन्ही डोस पूर्ण केले आहेत.
अमेरिका, इंग्लंड, रशिया, इस्रायल देशात लसीच्या बूस्टर डोसची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतात १८ वर्षांच्या पुढील नागरिक व बालकांना लस देण्यासाठी अजून १३० कोटी डोसची गरज असून, त्यासाठी पुढील वर्ष जाणार आहे. मग हे अवडंबर कशासाठी, असा सवालही त्यांनी केला.
पेट्रोल, डिझेल दरात भरमसाठ वाढ केल्याने महागाईचा आगडोंब उडाला आहे. एकीकडे महागाई आणि दुसऱ्या बाजूला भूकबळी आहे. बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तानपेक्षा भारतात अधिक भूकबळी आहे. सोया केक आयात केल्याने सोयाबीनचे दर घसरले. शेतकरीविरोधी भूमिका घेऊन दहशत माजविण्याचे काम सुरू आहे.
सुशांतसिंहप्रकरणी माफी मागावी
निवडणूक आली, की सामान्य माणसाचे लक्ष विचलित करण्यासाठी एखादे प्रकरण काढायचे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे पुढे काय झाले, हे विचारण्याचा जनतेचा अधिकार आहे. या प्रकरणात पुरावे गोळा करता आले नाहीत, चूक झाली म्हणून भाजपने जनतेची माफी मागावी, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
..तर सतेज पाटील कॅबिनेट मंत्री असते
गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे काँग्रेसमधील उगवते नेतृत्व आहे. त्यांचे भविष्य उज्ज्वल असून, ते कर्तृत्ववान आहेत. आपण मुख्यमंत्री असतो तर ते निश्चितच कॅबिनेट मंत्री असते, अशी स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.