पत्ते खेळणा-यांची पाठराखण!
By Admin | Published: August 29, 2014 03:30 AM2014-08-29T03:30:33+5:302014-08-29T03:30:33+5:30
पत्ते खेळण्यापेक्षा कॅरम खेळा,’ असे म्हणत मुंबई पोलिसांनी पत्ते खेळणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश दिले आहेत
मुंबई : ‘पत्ते खेळण्यापेक्षा कॅरम खेळा,’ असे म्हणत मुंबई पोलिसांनी पत्ते खेळणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र ‘पत्ते खेळणे वाईट नसून जुगार खेळणे वाईट आहे,’ असे म्हणत बृहन्मुंंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पोलिसांमार्फत पत्ते खेळणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाल्यास पाठीशी उभे राहणार असल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’ला दिली आहे. परिणामी गणेशोत्सवाच्या १० दिवसांत मुंबई पोलिसांविरोधात समन्वय समिती आणि गणेश मंडळे असा नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विरंगुळ्यासाठी पत्त्यांऐवजी कॅरमचा पर्याय मान्य असल्याचे समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबांवकर यांनी सांगितले. त्यासाठी लवकरच नगरसेवक आणि आमदार फंडातून मंडळांना किमान २ कॅरम मिळावेत, म्हणून विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे सांगताना पत्ते खेळणे वाईट नसून जुगार खेळणे वाईट असल्याचे सावध वक्तव्य त्यांनी केले. जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी नक्कीच कारवाई करावी, असे सांगणाऱ्या दहिबांवकर यांनी नुसते पत्ते खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्यास त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता पैसे लावून आणि पैसे न लावून पत्ते खेळणारे कसे शोधायचे, हे समन्वय समितीलाच स्पष्ट करावे लागणार आहे. पोलीस मात्र पत्ते खेळणाऱ्यांवर कारवाईसाठी सज्ज आहेत.
दरम्यान, गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसदर्भात विविध मागण्यांसाठी समन्वय समिती आणि मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. त्याबाबत सांगताना दहिबांवकर म्हणाले, ‘इकोफ्रेंडली गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना राज्य शासनातर्फे एका मूर्तीसाठी ५०० रुपये अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. पुढील वर्षापासून अनुदान देण्यात येईल. शिवाय पालिकेच्या जी/साऊथ वॉर्डमधील खड्डे न बुजवल्याने ४२ मंडळांना दंड ठोठावत यंदाच्या परवानग्या रोखण्यात आल्या होत्या. त्या परवानग्या तत्काळ देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.’
४ दिवस वाजवा रात्री १२ वाजेपर्यंत...
ध्वनिप्रदूषण नियमाअंतर्गत रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्याची परवानगी आहे. मात्र या मर्यादेतून गणेशोत्सवातील ४ दिवस सूट देण्यात आली आहे. त्यामुळे २, ४, ७ आणि ८ आॅगस्ट या दिवशी मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवता येणार आहेत.
ध्वनिमर्यादेसाठी केंद्राला साकडे
मंडळांना वर्षातील १० दिवस ध्वनिप्रदूषण नियमाअंतर्गत ध्वनिमर्यादेतून सूट दिली आहे. त्यातील ४ दिवसांची सूट ही गणेशोत्सवासाठी आहे. मात्र, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने वर्षातील ३० दिवस सूट देऊन गणेशोत्सवासाठी त्यातील १० दिवस सूट द्यावी, असे निवेदन समन्वय समितीने केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना दिले आहे.