शहरातील मसाज सेंटरवर छापे, दोन महिलांसह चौघांना अटक
By admin | Published: May 24, 2017 12:05 AM2017-05-24T00:05:29+5:302017-05-24T00:05:29+5:30
आंतरराज्यीय सेक्स रॅकेट : सहा पीडित तरुणींची सुटका
कोल्हापूर : नाव सोनेरी, मसाजही सोनेरी अशा जाहिरातींच्या नावाखाली राजरोस वेश्या व्यवसाय करणाऱ्या शहरातील दोन मसाज सेंटरवर परिवीक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने छापे टाकून चौघांना अटक केली; तर गुजरात, मुंबई, सोलापूर, कासेगाव येथील सहा पीडित तरुणींची सुटका केली. या कारवाईने शहरासह उपनगरांत आंतरराज्यीय सेक्स रॅकेट चालविले जात असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईने पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
संशयित जयकुमार संतोष पवार (वय ५३, रा. सुतार मळा, फुलेवाडी), प्रशांत वसंतराव रहिनाक (३२, रा. शनिवार पेठ, कराड), पूनम गणपत खंदारे (३५), स्वाती विनोद केसरकर (३५, दोघी रा. ज्ञानेश्वरनगरी, आपटेनगर) अशी त्यांची नावे आहेत. संशयित आरोपी "ा स्वत:च्या उपजीविकेसाठी पीडित तरुणींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करीत होत्या. रात्री उशिरा तरुणींची ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांची तेजस्विनी महिला सुधारगृहात रवानगी केली.
राजारामपुरी, शाहूपुरी, मंगळवार पेठ, नागाळा पार्क, ताराबाई पार्क , आदी उच्चभ्रू परिसरांत मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक नवटके यांना मिळाली. त्यांनी हातकणंगले, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, आदी उपनगरांसह वाशीनाका व लक्ष्मीपुरी परिसरातील मसाज सेंटरवर छापे टाकले.
लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज रस्त्यावर रिलायन्स मॉलशेजारी कपिल चेंबर्समध्ये सुखायू मसाज सेंटर आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन बनावट गिऱ्हाइके पाठवून खात्री केली. त्यानंतर नवटके यांनी पथकासह छापा टाकला. यावेळी अड्डामालक जयकुमार पवार व प्रशांत रहिनाक मिळून आले. त्यांच्यासोबत आतील खोलीत चार पीडित तरुणी सापडल्या. या तरुणी कोल्हापूर, मुंबई, सोलापूर, कासेगाव येथील आहेत.
दरम्यान, आपटेनगर येथे राहणाऱ्या पूनम खंदारे व स्वाती केसरकर "ा दोघी आंतरराज्यीय सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती नवटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी या दोघींच्या हालचालींवर पाळत ठेवली. सोमवार (दि. २२) रोजी पूनम खंदारे हिने एका गिऱ्हाइकास दोन तरुणी दाखविल्या. त्यांपैकी एकीस पसंत करून दहा हजार रुपये दर ठरला. त्याच्याकडून एक हजार रुपयांचे टोकन स्वीकारून तरुणीला त्याच्या ताब्यात दिले. याचवेळी पोलिसांनी छापा टाकून खंदारे हिला ताब्यात घेतले. यावेळी गिऱ्हाईक पळून गेले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने सेक्स रॅकेट चालवीत असल्याची कबुली दिली. त्या राहत असलेल्या आपटेनगर येथील घरी छापा टाकून पोलिसांनी आणखी एका तरुणीची सुटका केली. यावेळी मोपेड, मोबाईल, रोकड असा सुमारे तीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
हॉटेल, फ्लॅटवर व्यवसाय
पूनम खंदारे ही स्वाती केसरकरच्या घरी राहते. या दोघींनी मिळून हायफाय वेश्या व्यवसाय सुरू केला होता. सेक्स रॅकेटच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील एजंटाशी संपर्क साधून आंतरराज्यीय मुली पुरविण्याची मागणी केली. त्यानुसार गुजरातमधील दोन तरुणी कोल्हापुरात वेश्या व्यवसायासाठी आणल्या. त्या त्यांच्यासोबत राहत होत्या. फोनवरून गिऱ्हाइकाशी संपर्क साधून त्याला तरुणी दाखवीत असत. दर निश्चित झाल्यानंतर त्यांना बाहेर हॉटेल, फ्लॅटवर पाठविले जात होते.