निवृत्त अभियंत्याच्या घरांवर छापे
By admin | Published: June 24, 2016 05:16 AM2016-06-24T05:16:53+5:302016-06-24T05:16:53+5:30
बेहिशेबी मालमत्ता (अपसंपदा) संपादित केल्याप्रकरणी कोकण विभागातील पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता संशयित बाळासाहेब भाऊसाहेब पाटील
कोल्हापूर/सोलापूर : बेहिशेबी मालमत्ता (अपसंपदा) संपादित केल्याप्रकरणी कोकण विभागातील पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता संशयित बाळासाहेब भाऊसाहेब पाटील (वय ६२, मूळ राहणार अकलूज, जि. सोलापूर) यांच्या कोल्हापुरातील सहा घरांसह पुण्यातील दोन, सोलापूर जिल्ह्यातील एक अशा एकूण नऊ घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी छापे टाकले.
पाटील यांच्या कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील महाडिक माळ, नागाळा पार्क, राजारामपुरी, तोरणानगर व एच. आर. टू ई वॉर्ड येथील घरांवर छापे टाकण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील, तसेच पुण्यातील घोरपडी पेठ आणि शिवाजीनगर येथील घरांवरही छापे टाकण्यात आले.
कोल्हापूरचे पो. उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले की, ‘पाटील हे बाळगंगा घोटाळ््यातील संशयित आरोपी आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे निविदा भरून सरकारची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सुमारे ९२ कोटी ६३ लाख रुपयांचा हा घोटाळा आहे. त्यांनी ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा एकूण एक कोटी ५९ लाख ७५ हजार ७६१ रुपयांची अपसंपदा मिळविली आहे. त्यामुळे हे छापे टाकण्यात आले.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी पाटील यांच्यासह संशयित पत्नी शुभलक्ष्मी पाटील, मुलगा उत्कर्ष, हर्षप्रतीक पाटील यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद सोलापूरचे उपअधीक्षक अरुण देवकर यांनी दिली. त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८चे कलम १३ (१), (ई)सह १३ (२)प्रमाणे व भारतीय दंडविधान संहिता कलम १०९ प्रमाणे गुन्हे दाखल झाले.
ही आहेत नऊ ठिकाणे...
कोल्हापूर : महाडिक माळ, नागाळा पार्क, राजारामपुरी, तोरणानगर, एच.आर.टू ई वॉर्ड
पुणे : घोरपडी, शिवाजीनगर
सोलापूर : सांगोला