लसीकरणात रायगड तेराव्या क्रमांकावर; काेराेना हद्दपार करण्यासाठी सरकार, प्रशासनाने कसली कंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 01:28 AM2021-01-30T01:28:47+5:302021-01-30T01:28:59+5:30
तब्बल साडेआठ हजार आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटवर काम करणाऱ्यांनी काेराेनाची लस टाेचण्यासाठी नाेंदणी केली आहे.
आविष्कार देसाई
रायगड : काेराेना लसीकरणामध्ये रायगड जिल्हा १३ व्या स्थानावर आहे. राज्याच्या तुलनेत खालून दुसऱ्या क्रमांकावर जिल्ह्याने चांगली प्रगती केल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. लसीकरणाचा आकडा वाढावा यासाठी आराेग्य यंत्रणेनी उरण, माणगाव आणि कर्जत या ठिकाणीही लसीकरणाला सुरुवात केली आहे. तसेच काही खासगी रुग्णालयातही सोय उपलब्ध केली आहे. जिल्ह्यातील काेराेनाचा विषाणू हद्दपार करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे.
तब्बल साडेआठ हजार आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटवर काम करणाऱ्यांनी काेराेनाची लस टाेचण्यासाठी नाेंदणी केली आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यासाठी ९ हजार ६०० डाेस प्राप्त झाले हाेते. १६ जानेवारी राेजी अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, एमजीएम कामाेठे, येरला मेडिकल काॅलेज या चार केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली हाेती. लसीकरणासाठी ज्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यांच्यामार्फत लसीकरणासाठी म्हणावा तसा प्रतिसाद येत नसल्याने लसीकरणाची प्रक्रिया कासव गतीने हाेत हाेती मात्र काही दिवसात हा आकडा बऱ्यापैकी वाढला असला तरी,लस टाेचून घेण्याबाबत अद्यापही संभ्रम आहे. लसीमुळे दुष्परिणाम हाेतील. त्यामुळे आपल्या आराेग्यवर विपरीत परिणाम हाेणार असल्याची भीती संबंधितांमध्ये आहे. त्यामुळे आधी तुम्ही घ्या नंतर आम्ही घेताे. अशी धारणा आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटवर्कर यांच्यामध्ये झाली आहे. वरिष्ठ अधिकारी त्यांना लसीबाबत जागरुक करत आहेत. मात्र लसीच्या दुष्परिणामांची दहशत त्यांच्यामधून संपली नसल्याचे दिसून येते.
जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात ११ हजार डाेस प्राप्त
काेराेना लसीकरणासाठी तब्बल साडेआठ हजार आराेग्य कर्मचाऱ्यांनी नाेंदणी केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी नऊ हजार ६०० डाेस उपलब्ध झाले. तर दुसऱ्या टप्प्यात ११ हजार डाेस प्राप्त झाले आहेत.
नव्याने नाेंदणी करण्यात आल्यावर पुढील डाेसचा पुरवठा सरकारकडून करण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात लसीकरण करताना सुमारे दाेन टक्के वाया गेले हाेते. त्यानंतर ते प्रमाण सुमारे तीन टक्यापर्यंतच असल्याचा दावा आराेग्य विभागाने केला आहे.
लसीकरणासाठी नाेंदणी केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत जिल्ह्याला अतिरिक्त डाेस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे लस कमी पडणार नाही. ११ हजार डाेसची दुसरी खेपही जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. त्यामुळे काेराेना लसीचा तुटवडा पडणार नसल्याचे दिसते.
रायगड जिल्हा १३ व्या क्रमांकावर आहे, तर १४ व्या स्थानी नंदुरबार, १५ व्या स्थानी ठाणे जिल्हा असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. रायगडच्या पुढे १२ व्या स्थानी पुणे, ११ व्या स्थानी नांदेड आहे, अशी माहिती आराेग्य उपसंचालक ठाणे कार्यालयाने दिली.
लसीकरणात महिलांचे प्रमाण
काेराेना लस टाेचून घेण्यासाठी माेठ्या संख्येने महिलांनीही नाव नाेंदणी केलेली आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावर लसीकरणाला महिलांचा विशेष सहभाग असल्याचे दिसून येते. आतापर्यंत सुमारे ६३ टक्के महिलांनी काेराेना लस टाेचली आहे. आकडेवारी पाहिल्यास महिला पुरुषांपेक्षा पुढे असल्याचे चित्र आहे.