रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले
By admin | Published: August 2, 2016 02:50 AM2016-08-02T02:50:58+5:302016-08-02T02:50:58+5:30
रायगड जिल्ह्याला गेल्या २४ तासांत पावसाने अगदी झोडपून काढले आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्याला गेल्या २४ तासांत पावसाने अगदी झोडपून काढले आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांच्या पातळीत विक्रमी वाढ होऊन नद्यांची पातळी पूररेषेकडे झेपावत आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीत पावसाचे पाणी भातरोपांच्या वर गेले असल्याने भातपीक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकू ण २,५२८.२० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक २९० मि.मी. पावसाची नोंद कर्जत येथे झाली आहे.
यंदाचे सोमवारचे हे सरासरी पर्जन्यमान जिल्ह्यात १५८ मि.मी. आहे. गतवर्षी याच दिवशी जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान केवळ १०.८४ होते. जिल्ह्यातील वार्षिक एकूण अपेक्षित सर्वसाधारण ५० हजार २८२ मि.मी. पावसापैकी सोमवारी सकाळी आठ वाजता ७० टक्के म्हणजे ३४ हजार ९३३ मि.मी. पाऊस पूर्ण झाला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका नदी क्षेत्रातील कोलाड येथे २४ तासांत २०५ मि.मी. पाऊस झाला असून, नदीची जलपातळी डोळवहाळ येथे २३.३५ मीटर झाली आहे. कुंडलिका नदीची प्रत्यक्ष पूरपातळी २३.९५ मीटर असल्याने नदीकिनारीच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उल्हास नदीची जलपातळी कर्जत येथे ४४.६० मीटरला पोहोचली असून, नदीची प्रत्यक्ष पूरपातळी ४८.७७ मीटर आहे.
पाताळगंगा नदी क्षेत्रातील खालापूर येथे १३६ मि.मी. पाऊस झाला असून, नदीची जलपातळी लोहप येथे १९.०२ मीटरला पोहोचली असून, नदीची प्रत्यक्ष पूरपातळी २१.५२ मीटर आहे. अंबा नदीची जलपातळी नागोठणे येथे ७.३५ मीटरला पोहोचली आहे. अंबा नदीची प्रत्यक्ष पूरपातळी ९ मीटर आहे. सावित्री नदीची जलपातळी महाड येथे ४.२० मीटरला पोहोचली आहे. सावित्री नदीची प्रत्यक्ष पूरपातळी ६.५० मीटर आहे. गाढी नदीची जलपातळी पनवेल येथे २.९० मीटरला पोहोचली असून, नदीची प्रत्यक्ष पूरपातळी ६.५५ मीटर आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
(अधिक छायाचित्रे/४)
>७२ तासांकरिता अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या ७२ तासांत जिल्ह्यात अति व तीव्र स्वरूपाच्या पर्जन्यवृष्टीची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहावे तसेच पावसाच्या निमित्ताने कोणतीही समस्या आल्यास आपल्या तालुक्याच्या वा जिल्ह्याच्या आपत्ती निवारण कक्षास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी केले आहे.
२४ तासांत पाऊस
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत रोहा तालुक्यात २२० मि.मी. पावसाची नोंद झाली. पनवेल १९३ मि.मी., म्हसळा १९२ मि.मी., मुरु ड १८९ मि.मी., माथेरान १७०, तळा १६८, सुधागड पाली १५८, पेण १५५, श्रीवर्धन १४५, खालापूर १३६, पोलादपूर १२३, महाड १२२, माणगांव ११५, अलिबाग ९४, उरण ५८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे सरासरी पर्जन्यमान ६७.७५ मि.मी. आहे.
>संरक्षक भिंत कोसळून घराचे नुकसान
नेरळ : पावसामुळे कर्जत तालुक्यातील उमरोली येथे सोमवारी पहाटे एका घराची संरक्षक भिंत कोसळली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी संरक्षक भिंत दुसऱ्या घरावर कोसळून समोरील घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. तलाठीमार्फत पंचनामा करण्यात आला. लवकरात लवकर शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे. उमरोली येथील भागा जैतू गायकर यांच्या घरासमोरील संरक्षक भिंतीचा पाया खचल्याने ती भिंत किरण बाळू घारे यांच्या घरावर कोसळली. घराचा दरवाजा, भिंत, पत्रे तुटून प्रचंड नुकसान झाले आहे. तलाठी एम. एच. धोत्रे यांनी घटनास्थळाची पाहणी करून यात सुमारे ४२ हजारांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी सरपंच मोनिका सालोखे आदी उपस्थित होते.
>मागील वर्षीच आम्ही नवीन घर बांधले होते. परंतु पावसामुळे समोरील घराची संरक्षक भिंत कोसळून आमच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाची मदत लवकरात लवकर मिळावी.
- किरण बाळू घारे,
नुकसानग्रस्त, उमरोली