Raigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो! मुख्यमंत्र्यांचा तळीयेकरांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 07:41 AM2021-07-25T07:41:49+5:302021-07-25T07:43:10+5:30
शनिवारी रायगडमधील तळीये या दुर्घटनाग्रस्त गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले.
मुंबई : “तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीषण दरडसंकटात सापडलेल्या नागरिकांना धीर दिला.
शनिवारी रायगडमधील तळीये या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. दरडीखाली गाडल्या गेलेल्या ढिगाऱ्यातून आता कोणी जिवंत बाहेर निघण्याची शक्यता राहिलेली नाही. घटनास्थळावर नातेवाइकांचा आक्रोश सुरू होता. त्यांचे सांत्वन करताना मुख्यमंत्र्यांनाही शब्द सुचत नव्हते.
डाेंगर उतारावरील सर्व वाड्या, वस्त्यांंचे पुनर्वसन करण्यासाठी लवकरच आराखडा तयार करण्यात येईल. तुम्ही धीर साेडू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे. सर्वाेताेपरी मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमध्ये माणसेच काम करतात. अतिवृष्टी, पुराचे पाणी, रस्ते खचणे यामुळे त्यांना घटनास्थळी पाेहोचण्यास उशीर हाेताे. पावसाचे प्रमाण आणि परिणाम काेणीच ठरवू शकत नाही. बचाव पथके जोमाने काम करीत आहेत, असे ठाकरे म्हणाले.
सांगली, सातारा कोल्हापूर या ठिकाणीही पूर परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे जल व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येईल. केंद्र सरकार, लष्कर यांची मदत मिळत असल्याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
म्हाडा वसविणार नव्याने तळीये गाव
जवळपास संपूर्ण तळीये गाव दरडीखाली दबले आहे. परंतु, म्हाडा पुन्हा नव्याने तळीये गाव वसविणार असल्याचे राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले. गावात जेवढी घरे यात जमीनदोस्त झाली आहेत, तेवढी पक्की घरे पुन्हा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षा पुन्हा देण्याची संधी
महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागात जे विद्यार्थी २५ ते २७ जुलै दरम्यान होणाऱ्या जेईई मेन-२०२१ सेशन ३ परीक्षा देण्यासाठी केंद्रांवर पोहोचू शकणार नाहीत, त्यांना या परीक्षेसाठी आणखी संधी दिली जाणार आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले आहे.
कोल्हापुरात काय स्थिती?
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या प्रचंड रांगा.
पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सक्तीने बाहेर काढले. चिखली, आंबेवाडीत अद्याप २५० जण अडकलेेत.
कोल्हापुरात पाणीबाणी, नागरिकांची पाण्यासाठी धावपळ. ‘सेंट्रल किचन’मधून रोज दीड हजार पूरग्रस्तांना जेवण; कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपकडून मदतीचा हात.