रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: सुनील तटकरेंनी सर केला रायगडचा 'गड'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 02:46 PM2019-05-23T14:46:34+5:302019-05-23T14:47:46+5:30
राज्यभरात शिवसेना-भाजपा युती जोरदार मुसंडी मारली असताना रायगडमध्ये मात्र युतीला धक्का बसला आहे.
रायगड - राज्यभरात शिवसेना-भाजपा युती जोरदार मुसंडी मारली असताना रायगडमध्ये मात्र युतीला धक्का बसला आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे 21 हजार मतांनी निवडून आले आहेत. तटकरेंनी केंद्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांना पराभवाचा धक्का दिला.
रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यामध्ये अखेरपर्यंत अटीतटीची झुंज सुरू होती. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये सुनील तटकरे यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र मतमोजणीच्या मध्यावर तटकरे यांनी घेतलेली आघाडी मोडून काढत अनंत गीते यांनी आघाडी घेतली होती. मात्र दोन्ही नेत्यांना मिळालेल्या मतांमध्ये फारसे अंतर नसल्याने या मतदारसंघात टफफाईट सुरू होती. अखेरीस सुनील तटकरे यांनी सुनील तटकरे यांनी 21 हजार मतांनी विजय मिळवला.
कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. गेल्या दोन तीन दशकात अपवाद वगळता कोकणात शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघामध्येही गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अनंत गीते हे निवडून आले होते. मात्र यावेळी कोकणातील शिवसेनेचा गड अडचणीत असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या अनंत गीतेंसमोर कडवे आव्हान उभे केले होते. त्यामुळे आज मतदार नेमका काय कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना 3 लाख 96 हजार 178 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना यांना 3 लाख 94 हजार 068 मतं मिळाली होती. त्यावेळी अनंत गीते केवळ 2 हजार 110 मतांनी विजयी झाले होते.