'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 04:46 PM2024-05-05T16:46:56+5:302024-05-05T17:20:10+5:30
बाळासाहेबांचे कर्ज महाराष्ट्राची जनता व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
Raigad Loksabha Election : रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलिबाग येथे महाविकास आघाडीची सभा घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदींनी मुलाखतीमध्ये केलेल्या विधानावर भाष्य केलं. मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, त्यांच्यावर कुठलंही संकट आलं तरी मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असे म्हटलं होतं. तर मोदीचं माझ्यावरचे संकट आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
"मोदी आणि शाहांना महाराष्ट्राने भरभरुन दिलं कारण दोन वेळेस अख्खी शिवसेना सोबत होती. तेव्हा मोदींनी इतक्या सभा घेतल्याचे मला आठवत नाही. पण आता प्रत्येक गल्लीबोळात फिरत आहेत. एवढं करुन तुम्ही महाराष्ट्राचा घात केलात. मध्येच त्यांना माझ्याबद्दल काय प्रेम आलं देव जाणे. मोदींच्या सुरक्षेची मला गरज नाही. मला माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि जनतेचे कवच माझ्या अवतीभवती आहे. माझ्यावर संकट म्हणून तुम्ही आलेलं आहात. मोदींनी मला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता असं म्हणत आहेत. ठीक आहे मी खऱ्या खोट्यामध्ये जात नाही. मोदी फक्त माझ्याशी खोटं बोलले नाहीत. मोदींची गॅरंटी मला नको माझी गॅरंटी माझ्या समोर आहे. तुमच्या चेल्या चपाट्यांना माहिती नव्हतं का मोदींचे माझ्यावर किती प्रेम आहे? मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या गद्दारांसोबत हुडी घालून बोलणी कोण करत होतं? हिंदुहृदयसम्राट हा शब्द उच्चारायला तुम्हाला जड जातोय. बाळासाहेबांचे कर्ज महाराष्ट्राची जनता व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"उद्धव ठाकरेंसाठी मोदींनी खिडक्या उघडल्याचा संभ्रम पसरवला जात आहे. पण महाराष्ट्र लुटणाऱ्यांसोबत शिवसेनाप्रमुखांचा पुत्र जाणार नाही. महाराष्ट्र ओरबाडून तुम्ही जातीपातीमध्ये विष कालवत आहात. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. पण तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली नंगानाच करत आहात. आम्ही घरातील चूल पेटवणारी माणसं आहोत आणि तुम्ही घर पेटवणारी. मोदींनी फक्त तुम्हाला त्रास दिला. तुम्हाला आनंद होईल असं काही दिलं असेल तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन. पण लोकांनी मला सांगावं की आम्ही मोदींवर खूश आहोत," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"अमित शाह जो विषय म्हणतील त्यावर मी बोलायला तयार आहे. पण निवडणुकीमध्ये तुमच्यात हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नांवर बोला. गाईवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोला. मोदीच म्हणाले होते मोठे स्वप्न पाहा. तुम्ही गाईवर बोलता आम्ही महागाईवर बोलतो. तुमचं संविधान बदलण्याचे स्वप्न बघितलं. संघाचे लोक मला भेटतात आणि म्हणतात उद्धवजी तुम्ही करताय ते बरोबर आहे. ज्यांच्याविरुद्ध आम्ही लढलो त्यांचाच प्रचार करावा लागतोय, त्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागतात असे ते सांगतात. अमित शाह जेव्हा बाळासाहेबांच्या फोटोसमोर नाक घासायला आले होते तेव्हासुद्धा मी त्यांचाच मुलगा होतो. आता तुम्हाला वाटत असेल की मी बाळासाहेबांचे विचार सोडले तर २०१४ मध्ये एकनाथ खडसेंनी मला फोन करुन सांगितले की वरतून आदेश आले आहेत आणि आम्ही युती तोडत आहोत. तेव्हा मोदींना हे माहिती नव्हतं का? तुमच्या आदेशाशिवाय युती तोडली तेव्हा माझ्याबद्दलचे प्रेम कुठं गेलं होतं," असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.