रायगड पोलिसांची साताऱ्यात दोघांना बेदम मारहाण
By Admin | Published: December 20, 2015 12:46 AM2015-12-20T00:46:49+5:302015-12-20T00:46:49+5:30
चोरीच्या संशयावरून रायगड पोलिसांनी साताऱ्यातील दोघांना बेदम मारहाण केली. येथील एका मैदानावर शुक्रवारी मध्यरात्री दोघेही बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्यावर शासकीय
सातारा : चोरीच्या संशयावरून रायगड पोलिसांनी साताऱ्यातील दोघांना बेदम मारहाण केली. येथील एका मैदानावर शुक्रवारी मध्यरात्री दोघेही बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांचे नातेवाईकांसह संतप्त जमावाने केली. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव पोलीस ठाण्यातून निघून गेला.
विनोद जगन्नाथ घाडगे व बशीर शेख अशी जखमींची नावे असून सुमारे १५ दिवसांपूर्वी या दोघांना रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलिसांनी एका चोरीच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी एका पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण करून दोघांना परत साताऱ्यात आणून सोडले. त्यानंतर ७ डिसेंबरला हेच पोलीस उपनिरीक्षक साताऱ्यात आले. त्यांनी विनोदला फोन करून बोलावून घेऊन एका लॉजमध्ये मारहाण केली. ‘तुझ्याबरोबर चोरीत कोण-कोण आहेत?,’ अशी विचारणा केली. तसेच ‘तुझा एन्काउंटर करू, मोक्का लावू,’ अशी धमकीही दिली.
दोघांचाही जबाब नाही...
नातेवाइकांनी जखमींचा जबाब घेण्याची मागणी केली होती; पण रात्री उशिरापर्यंत जखमींचा जबाब घेण्यात आलेला नव्हता. जखमी दोघांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.