रायगड पोलिसांचे ४८ तासांत ११ ठिकाणी छापे

By admin | Published: April 7, 2017 02:50 AM2017-04-07T02:50:55+5:302017-04-07T02:50:55+5:30

उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गावरील दारूच्या दुकानांवर कडक निर्बंध लावल्याने तळीरामांची चांगलीच अडचण झाली

Raigad Police raids 11 places in 48 hours | रायगड पोलिसांचे ४८ तासांत ११ ठिकाणी छापे

रायगड पोलिसांचे ४८ तासांत ११ ठिकाणी छापे

Next

अलिबाग : उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गावरील दारूच्या दुकानांवर कडक निर्बंध लावल्याने तळीरामांची चांगलीच अडचण झाली आहे. दारूबंदीच्या विरोधात रायगड पोलीसही कमालीचे सक्रिय झाले आहेत. गेल्या ४८ तासांमध्ये विविध तालुक्यामध्ये छापे टाकून तब्बल तीन लाख ६१ हजार ७७० रुपयांची देशी-विदेशी आणि गावठी दारू जप्त केली आहे. मुरुड तालुक्यामध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील अपघात हे वाहन चालकाने मद्य प्राशन केल्याने होत असल्याचे समोर आले आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात गांभीर्यपूर्वक लक्ष दिले आहे. महामार्गावरील ५०० मीटर अंतरावर असणारी सर्व मद्याची दुकाने, बार यांचे परवाने ३१ मार्च २०१६ पर्यंत रद्द करण्याचे आदेश दारूबंदी विभागाला दिले होते. १ एप्रिलपासून त्याची कडक अंमलबजावणी करण्यास दारूबंदी विभागाने सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे रायगडच्या दारूबंदी विभागाला तब्बल २०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण महसुलात प्रचंड घट झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे.
न्यायालयाने कठोर पावले उचलण्यास दारूबंदी विभागाला भाग पाडले असतानाच रायगड जिल्हा पोलिसांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अवैध दारू व्यवसाय, वाहतुकीवर वक्रदृष्टी केली आहे.
गेल्या ४८ तासांमध्ये जिल्ह्याच्या ११ ठिकाणी रायगड पोलिसांनी छापेमारी केली. त्यामध्ये देशी, विदेशी तसेच गावठी दारूचे साठे हस्तगत केले आहेत. तब्बल तीन लाख ६१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सर्वाधिक मोठी कारवाई मुरुड तालुक्यात करण्यात आली आहे. येथील दोन गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे दोन लाख दोन हजार ४३० आणि एक लाख २० हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित नऊ ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये गावठी दारूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून
येते. (प्रतिनिधी)
हातभट्टीची दारू पकडली
रेवदंडा : मुरुड-जंजिरा तालुक्यातील बोर्ली मोरापाडामधील कमला वरसोलकर हिच्या ताब्यात बरणीमध्ये विनापरवाना हातभट्टीची १० लिटर दारू दोनशे दहा रूपये किमतीची पकडली असून कमला वरसोलकर (५०) हिला अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विनापरवाना विदेशी दारू जप्त
रेवदंडा : मुरुड-जंजिरा तालुक्यातील साळाव चेक नाका येथे कारमधून विनापरवाना विदेशी दारूच्या १८ बाटल्या २ हजार ४३० रु पये किमतीच्या पकडल्या असून पोलिसांनी आरोपी सूरज पाटील (२५, रा. नेरे, ता. पनवेल) याला अटक केली असून त्याने वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. विदेशी दारू व कार मिळून दोन लाख २ हजार ४३० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष पवार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बेकायदा दारू विक्री
बोर्ली-मांडला /मुरु ड : मुरु ड येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १ लाख २० हजार ३९० किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आली आहे. मुरु ड शहरातील मौजे कुंभारवाडा येथे देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्र ी होत असल्याची माहिती मुरु ड पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानुसार मुरु ड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी मौजे कुंभारवाडा सापळा रचून धड टाकली. याबाबत मुरु ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड पोलिसांची धडक कारवाई अशीच सुरू राहणार असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मुरुड तालुक्यामध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
रोहा पोलिसांची धडक कारवाई
रोहा व कोलाड पोलिसांनी अवैध गावठी दारू धंद्याविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे गावठी दारूमाफियांचे धाबे दणाणले आहे. तीन ठिकाणी झालेल्या स्वतंत्र कारवाईत चार जणांना पोलिसांनी अटक केली असून यात दोन महिलांचा समावेश देखील आहे.रोहा यशवंतखार मार्गावरील मौजे शेणवई येथे आरोपी प्रकाश झावरे या व्यक्तीकडे ३ एप्रिल रोजी चौकशी व तपास केला असताना रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास या व्यक्तीकडे ३६ देशी दारूच्या ९०० रु. किमतीच्या बाटल्या बेकायदा सापडल्या. या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. १ एप्रिलपासून महामार्गावर सुप्रीम न्यायालयाने दारूबंदी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाइनशॉपी, बीअरबार, देशी दारू आदी मद्यविक्र ी करणाऱ्या दुकानदारांची मोठी पंचाईत झाली आहे. न्यायालयाने देशी दारूवर बंदी घातली असताना शेणवई येथे बेकायदा देशी दारू विक्र ी करणाऱ्यांना हिसका दाखवत कारवाईचा बडगा उगारला आहे. घोसाळे मार्गावरील पांगळोली ठाकूरवाडी या जंगलभागात तसेच कोलाड येथील पालेखुर्द गावाजवळील डोंगरभागात गावठी दारूमाफियांनी हैदोस घातला आहे. या गावठी दारू धंद्याविरोधात रोहा व कोलाड या दोन्ही भागातील पोलिसांनी आक्र मक होत या बेकायदा धंद्यांना नेस्तनाबूत करत त्यांच्याजवळील १३५० रुपये किमतीची ६० लि. गावठी दारू जप्त केली आहे. या गावठी दारूधंदे हटाव मोहिमेत केशव रामा हेगडे, सुरेखा केशव हेगडे, लक्ष्मी खेळू खोकडे यांच्याविरोधात कारवाई करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. परवानाधारक दारूविक्रे त्यांवर आलेल्या बंदीनंतर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे गावठी माफियांवर रोहा पोलिसांची आता करडी नजर असून डोंगर दुर्गम भागात धाडसत्र सुरू असल्याने गावठी माफियांची तारांबळ उडाली आहे.रोहा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे मागील चार दिवसांत अनेक गावठी दारू अड्डे नेस्तनाबूत करण्यात रोहा कोलाड पोलिसांना यश आले आहे. याबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
।पोलिसांनी गस्त घालावी
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रोहा शहरातील बहुतांश देशी दारू, बार, वाइनशॉप बंद झाल्याने तळीरामांची चांगलीच गोची झाली आहे. चोरटी दारू
विक्र ी केल्यानंतर मद्यपींनी कुंडलिका नदीचा आधार घेतला आहे. रोज संध्याकाळी नदीकाठी असंख्य मद्यपी दारूसेवन करण्यासाठी बसतात. ते खुलेआम धिंगाणा घालत आहेत.
त्रस्त नागरिकांनी याविषयी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्याकडे तक्र ार केली व जातीने लक्ष घालावे, अशी मागणी केली. पो.नि.निशा जाधव यांनी पोलिसांसह याठिकाणी हजेरी लावताच तळीरामांची एकच धावपळ उडाली.
याठिकाणी रोजच संध्याकाळी पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Raigad Police raids 11 places in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.