रायगड पोलिसांचे जबाब नोंदवले
By admin | Published: November 26, 2015 03:06 AM2015-11-26T03:06:52+5:302015-11-26T03:06:52+5:30
खळबळजनक शीना बोरा खूनप्रकरणी सीबीआयने तत्कालीन पोलीस अधीक्षक आर.डी. शिंदे वगळता रायगड पोलिसांतील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची जबानी नोंदवली आहे
मुंबई : खळबळजनक शीना बोरा खूनप्रकरणी सीबीआयने तत्कालीन पोलीस अधीक्षक आर.डी. शिंदे वगळता रायगड पोलिसांतील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची जबानी नोंदवली आहे. त्यात निरीक्षक सुरेश मिरगे आणि एसडीपीओ प्रदीप चव्हाण यांचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्णातील गोगादे या गावी स्थानिक नागरिकांना मानवी अवशेष सापडल्यानंतर पोलिसांनी तपास करताना अपघाती मृत्यूची
नोंद केली नव्हती. त्यामुळे सीबीआयतर्फे त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी एक पानाचा अहवाल दिला होता; मात्र त्यावर गृहविभागाचे समाधान झालेले नाही. त्यामुळे शिंदे यांची गृहविभागाने पुन्हा जबानी घेतली होती.
सीबीआयने मिरगे, चव्हाण, पोलीस नाईक विनोद भगत, कॉन्स्टेबल्स काशीनाथ म्हात्रे, सुनील सकपाळ, हवालदार संजय मगर यांची जबानी नोंदवली आहे. त्यावेळी हे सर्व जण रायगड पोलिसात होते; मात्र सीबीआयने आतापर्यंत शिंदेंची जबानी नोंदविलेली नाही.मिरगे यांची जबानी सहा पानी आहे. शिंदे यांनी त्यावेळी आपल्याला अपघाती मृत्यूची नोंद करू नका असा आदेश दिला होता, असे मिरगे यांनी त्यांच्या जबानीत म्हटले आहे. माजी पोलीस महासंचालकांनी शिंदे यांची जबानी नोंदवून घेतली होती; पण त्यांना
पुन्हा जबानी देण्यास सांगण्यात
आले आहे.
सीबीआयने यापूर्वीच आयपीएस अधिकारी देवेन भारती, खार पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश कदम यांची जबानी नोंदवून घेतली आहे; तथापि मुंबई पोलिसांतील अन्य पोलिसांची जबानी घेतलेली नाही.