रायगड सुरक्षारक्षकांचा धडक मोर्चा
By admin | Published: July 11, 2017 03:37 AM2017-07-11T03:37:56+5:302017-07-11T03:37:56+5:30
कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या खांदा वसाहत येथील आयुक्तालयावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील शेकडो रायगड सुरक्षारक्षक मंडळाच्या विविध आस्थापनातील कामगारांनी सोमवारी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या खांदा वसाहत येथील आयुक्तालयावर मोर्चा काढला.
खांदा वसाहत येथून निघालेला मोर्चा पोलीस ठाण्याच्या मार्गे कामगार आयुक्त कार्यालयावर धडकला. वर्षानुवर्षे काम करीत असलेल्या कामगारांना आयुक्तालयामार्फत कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. यामध्ये किमान वेतन २२ हजार, गणवेश, रेनकोट, स्वेटर, सेवा ज्येष्ठता, ओळखपत्र व इतर मूलभूत सुविधा मिळाव्या याकरिता कामगारांनी आंदोलन पुकारले होते. या मागण्यांचे निवेदन कामगार उपायुक्तांना देण्यात आले. या वेळी मागण्यांसंदर्भात कामगार मंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले. मोर्चात न्यू मेरीटाईम अॅण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रामन, सरचिटणीस वैभव पाटील, माजी नगरसेवक लतीफ शेख, किरीट पाटील यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते.