रायगडावर शिवभक्तीचा महापूर, शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 05:58 PM2018-06-06T17:58:51+5:302018-06-06T19:55:13+5:30
हर हर महादेव...जय जिजाऊ...जय शिवराय...,जय भवानी...जय शिवाजी असा अखंड जयघोष...पारंपरिक वाद्यांचा गजर अशा उत्साही वातावरणात बुधवारी दुर्गराज रायगडावर नेत्रदीपक ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. पालखी सोहळा, शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि शिवभक्तांचा अमाप उत्साह असे चैतन्यदायी वातावरण गडावर अनुभवायला मिळाले. सोबत धुक्याच्या दुलईने वातावरण प्रसन्नदायी झाले. या सोहळ्यासाठी लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली.
प्रवीण देसाई
रायगड : हर हर महादेव...जय जिजाऊ...जय शिवराय...,जय भवानी...जय शिवाजी असा अखंड जयघोष...पारंपरिक वाद्यांचा गजर अशा उत्साही वातावरणात बुधवारी दुर्गराज रायगडावर नेत्रदीपक ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. पालखी सोहळा, शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि शिवभक्तांचा अमाप उत्साह असे चैतन्यदायी वातावरण गडावर अनुभवायला मिळाले. सोबत धुक्याच्या दुलईने वातावरण प्रसन्नदायी झाले. या सोहळ्यासाठी लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीतर्फे रायगडावर ५ व ६ जून या कालावधीत ३४५व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे, शहाजीराजे, फिझिचे राजदूत रुनेलकुमार, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार हेमंत गोडसे, जि.प.चे शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, माजी सदस्य धैर्यशील माने, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे, रायगड विकास प्राधिकरणाचे प्रभाकर देशमूख, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सचिव अमर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बुधवारी सकाळी नगारखाण्यासमोर ध्वजारोहनाणे कार्यक्रमाला सुरवात झाली. राजसदरेवर मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर आकर्षक फूल रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या ठिकाणी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
सदरेवर टीम हायकर्सतर्फे गडकिल्ल्यावरून आणलेले पाणी नेण्यात आले. शिवछत्रपतींच्या जीवनावरील शाहिरांच्या पोवाड्यांनी सदरेवरील वातावरण उर्जादायी झाले होते. सोबत जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव अशा शिवभक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. कोल्हापूरच्या मराठा लाईट इंफ्रेंट्रीच्या जवानांनी लष्कर बँडच्या सुमधुर सुरांनी मानवंदना दिली.
सकाळी पावणे दहाच्या सुमारास पारंपरिक वाद्यांच्या गजरात राजसदरेवर शिवछत्रपतींची मूर्ती असलेल्या पालखीचे आगमन झाले. समितीतर्फे हेमंत साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरकाई मंदिर येथून ही पालखी आणण्यात आली. त्यापाठोपाठ शिवनेरीवरून शिवधनुष्य प्रतिष्ठानतर्फे आणलेल्या शिवछत्रपतींच्या पालखीचे तसेच पाचाड येथून राजमाता जिजाऊ यांची मूर्ती असलेल्या पालखीचे वाजत गाजत आगमन झाले.
पावणे दहाच्या सुमारास रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे आगमन झाले. यावेळी शिवभक्तांनी टाळ्यांच्या गजरात जल्लोषी स्वागत करत जयघोषाने परिसर दणाणून सोडला. यावेळी चोपदार उदय बोन्द्रे यांनी ललकारी दिली. यानंतर राजपुरोहित अमर जुगर यांनी मंत्रोच्चार सुरू केले.
यावेळी संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते शिवछत्रपती यांच्या चांदीच्या उत्सवमूर्तीस जलाभिषेक व दुग्धभिषेक करण्यात आला. यानंतर मेघडंबरीतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला.यानंतर संभाजीराजे व शहाजीराजे यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित शिवभक्तांना अभिवादन केले.त्याला उस्फूर्त दाद देत इएकाच जयघोष झाला.यानंतर संभाजीराजे पालखीसोबत जगदीश्वर मंदिराकडे रवाना झाले.
सोहळ्यासाठी दिल्लीसह तेरा राज्यातून मावळे उपस्थित
या सोहळ्यासाठी दिल्लीसह तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, उत्तरांचल, हरीयाना(पानिपत), कर्नाटक यासह सुमारे 13 राज्यातील 80 शिवभक्त मावळे उपस्थित होते. यामध्ये बलविंदर, देसराज तुरण, डॉ.सूनिल पवार, शुभम मराठा यांच्यासह 43 रोड मराठा बांधवांचा समावेश होता. त्यांनी पानिपतहुन माती व गंगाजल आणले होते.
समितीचे हजारो हात सोहळ्यासाठी राबले
या सोहळ्याच्या तयारीसह यशस्वीतेसाठी शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव अमर पाटील, विनायक फाळके, संजय पवार, हेमंत साळोखे, अजित पाटील, प्रवीण हुबाळे, सन्मान शेटे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचे हात अहोरात्र राबले.
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा शिव पाहिजे, असे एकापेक्षा एक सरस पोवाडे सादर करत राज्यभरातील शाहिरांनी या सोहळ्यात शिवऊर्जा निर्माण केली.शाहीर राजेंद्र कांबळे(अकलूज), सूरज जाधव(औरंगाबाद),बाळासाहेब भगत यांचेसह कोल्हापरचे आझाद नाईकवडी यांनी पोवाडे सादर केले. तसेच कोल्हापूरचे रंगराव पाटील, दिलीप सावंत हे उपस्थित होते.
गर्व वाटत आहे
या सोहळ्यासाठी आपण पहिल्यांदाच इथे आलो आहोत.छातीसगडसह विलासपूर, भिलाई, रायपूर, धमतरी या भागातून मराठा मावळे आले आहेत. या ठिकाणी आल्यावर आपल्याला गर्व वाटत आहे.
-राजेश सावळे,
भिलाई,छत्तीसगड
सोहळ्याला आल्यावर वेगळा आनंद
तत्कालिन मराठा साम्राज्यातुन अनेक मराठा कुटुंबे हैद्राबाद येथे येऊन स्थाईक झाली. आपले मूळ इथे आहे हे समजल्यावर चांगले वाटले. तसेच या सोहळ्याला आल्यावर एक वेगळा आनंद मिळाला.
-गोविंद भिसे,
हैद्राबाद
बांधवाना भेटल्याने प्रेम वाढले
पानिपतच्या लढाईत आमचे पूर्वज महाराष्ट्रातून येथे आले व स्थायिक झाले. या सोहळ्याच्या निमित्ताने आमचे इथल्या मातीशी असलेले ऋणानुबंध कायम झाले.पहिल्यांदाच या सोहळ्याला आलो असून आपल्या बांधवांना भेटल्याचा आनंद आपल्याला झाला.
-मराठा जगविरसिंग,
पानिपत
कुरुक्षेत्र येथेही सोहळा
हरियाणातील कुरुक्षेत्र येथेही बुधवारी संपूर्ण उत्तर भारतातील शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून छत्रपति शिवाजी विद्यार्थी परिषदेचे मराठा विरेंद्र वर्मा यांच्या संयोजनाने हा सोहळा होत असल्याचे जगविरसिंग यांनी सांगितले.