नव्या आरक्षण नियमावलीमुळे रेल्वेला फायदा
By admin | Published: April 3, 2015 02:23 AM2015-04-03T02:23:25+5:302015-04-03T02:23:25+5:30
रेल्वेचे तिकीट आरक्षण ६0 दिवसांच्या ऐवजी १२0 दिवस अगोदर करण्याचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आणि या नियमाचा मोठा फायदा रे
मुंबई : रेल्वेचे तिकीट आरक्षण ६0 दिवसांच्या ऐवजी १२0 दिवस अगोदर करण्याचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आणि या नियमाचा मोठा फायदा रेल्वेला झाला. मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेला एकूण ३६ कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षण करताना मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. यामध्ये दलालांचा हस्तक्षेप असल्यानेच प्रवाशांना तिकीट मिळण्यास समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते. हे पाहता दलालांची रेल्वे आरक्षणातील दलाली रोखण्यासाठी आणि भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ६0 दिवस अगोदर असलेले आरक्षण १२0 दिवस अगोदर करण्याचा निर्णय झाला. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याने प्रवाशांकडून तिकीट आरक्षण मिळविण्यासाठी तिकीट खिडक्यांवर आणि आयआयसीटीच्या वेबसाईटवर एकच झुंबड उडाली. त्यामुळे नव्या आरक्षण नियमावलीच्या पहिल्याच दिवशी देशभरात दुपारी ३ वाजेपर्यंत १0 लाखांपेक्षा अधिक तिकिटांचे आरक्षण झाले. तर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवरही आरक्षण दुप्पट वाढले.
१ एप्रिलच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर एकूण ७ लाख १0 हजार प्रवाशांनी तिकीट आरक्षण केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकिटांचे आरक्षण झाल्याने रेल्वेच्या तिजोरीतही घसघशीत रक्कम पडली.
या तिन्ही रेल्वे विभागांना मिळून ३६ कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.