रेल्वे अर्थसंकल्प अतिशय फसवा, अन्यायकारक

By admin | Published: February 27, 2015 11:15 PM2015-02-27T23:15:25+5:302015-02-27T23:21:52+5:30

नारायण राणे यांची टीका : प्रभू जनतेला देणारे नाहीत, तर स्वत:ला मिळवून घेणारे

Rail budget is very fraudulent, unjust | रेल्वे अर्थसंकल्प अतिशय फसवा, अन्यायकारक

रेल्वे अर्थसंकल्प अतिशय फसवा, अन्यायकारक

Next

कणकवली : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प अतिशय फसवा आणि अन्यायकारक आहे. प्रवाशांना भाडेवाढीचा भुर्दंड नसला तरी रेल्वेने मालवाहतुकीच्या रूपाने जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्याने महागाई वाढणारच आहे. हे प्रभू जनतेला देणारे नाहीत तर स्वत:ला मिळवून घेणारे आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी येथे केली.येथील ओम गणेश निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. नारायण राणे पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी शासनाचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प सुरेश प्रभू यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प जनतेची दिशाभूल करणारा आहे. सुरेश प्रभू यापूर्वीही मंत्री असताना त्यांनी सिंधुदुर्गचे सुपुत्र असूनही या भागाला झुकते माप दिलेले नाही. रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांना पायाभूत सुविधा देणार, रेल्वेत स्वच्छता वाढविणार अशा घोषणा केल्या आहेत. मात्र, या गोष्टी कराव्याच लागतात. नागरी सुविधा देणे हे शासनाचे कर्तव्यच आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. कोकणाला एकही जादा गाडी अर्थसंकल्पात देण्यात आलेली नाही. निदान आपल्या गावात जाण्यासाठी तरी प्रभूंनी नवीन गाडी देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. मुंबई व महाराष्ट्राकडून रेल्वेला जेवढे पैसे मिळतात, त्या प्रमाणात त्यांना सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही प्रभूकृपा कशी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.राणे म्हणाले, चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्गाचा सर्व्हे मी उद्योगमंत्री असताना करायला लावला आहे. त्याचे श्रेय इतर कोणालाही घेता येणार नाही. तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करून हे काम केले आहे. अप्रत्यक्षरीत्या महागाई वाढविणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रभूंनी रेल्वेमंत्री होण्यासाठी जेवढी मेहनत घेतली तेवढाच वेळ आपल्या खात्याला दिला असता, तर जनतेला काहीतरी मिळाले असते. पूर्वी मंत्री असताना सुरेश प्रभूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेले एकतरी विकासकाम दाखवावे. त्यामुळेच पुन्हा मंत्री झाल्यानंतर देशाला, तसेच कोकणालाही ते काही देऊ शकणार नाहीत, असे वक्तव्य यापूर्वी मी केले होते, असेही राणे म्हणाले. (वार्ताहर)


यापुढे काय
करायचे ते ठरवू
महाराष्ट्र तसेच कोकणला रेल्वे अर्थसंकल्पातून विशेष असे काहीच मिळालेले नाही. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी यापुढे प्रभू दर्शन होताच काय करायचे ते आम्ही ठरवू, असा खोचक इशाराही नारायण राणे यांनी दिला.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही
अनेक वर्षानंतर सत्ता मिळाल्याने शिवसेनेचे नेते पैसे कमवायच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांबरोबर त्यांचे कितीही खटके उडाले तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. सत्तेत राहण्यासाठी त्यांची लाचारी सुरू असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी हे कधीच सहन केले नसते. सिंधुदुर्गातील दोन नंबरचे धंदे मी बंद केले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी आता हप्ते बांधून ते सुरू केले आहेत, असेही राणे म्हणाले.

१०५ कोटी आणून दाखवा
जनतेची दिशाभूल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जिल्हा नियोजनअंतर्गत १०५ कोटी रुपयांचा निधी आधी आणून दाखवावा आणि त्यानंतरच वक्तव्ये करावीत. दोन शब्दही बोलू न शकणारे आमदार विधानसभेत गेले आहेत. त्यांचा काहीच अभ्यास नसल्याने जनतेचे प्रश्न ते सोडवू शकणार नाहीत.

मुख्यमंत्री स्वतंत्र विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते
सिंधुदुर्गातील सी-वर्ल्ड अथवा अन्य प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहीही देणे-घेणे नाही. त्यामुळे ते याबाबत काहीच निर्णय घेणार नाहीत. ते स्वतंत्र विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते असल्याने त्यांना त्या भागाचीच जास्त काळजी असल्याचे नारायण राणे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
काँग्रेसचे पुण्यात शिबिर
केंद्र तसेच राज्य शासनाने जनतेची निराशा केली असून, भूसंपादन विधेयक तसेच अनेक प्रश्नांबाबत शासनाला घेरण्यासाठी काँग्रेसचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार होत आहे. पुणे येथे १४ व १५ मार्च रोजी यासाठी काँग्रेसचे शिबिर आयोजित करण्यात आले असून, त्यानंतर कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला जाईल.
भविष्यात जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस आक्रमक होईल, असे राणे यांनी सांगितले आहे.

Web Title: Rail budget is very fraudulent, unjust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.