राज्यात रेल्वेचा विकास आता ‘फास्ट ट्रॅक’वर!

By admin | Published: April 22, 2016 04:24 AM2016-04-22T04:24:48+5:302016-04-22T04:24:48+5:30

मुंबईसह राज्यभरातील २३ हजार कोटी रुपयांचे ९ प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी येथे दिली

Rail development in the state is now on the fast track! | राज्यात रेल्वेचा विकास आता ‘फास्ट ट्रॅक’वर!

राज्यात रेल्वेचा विकास आता ‘फास्ट ट्रॅक’वर!

Next

मुंबई : येत्या काही वर्षांत महाराष्ट्रात रेल्वेचा सुपरफास्ट विकास होणार असून, मुंबईसह राज्यभरातील २३ हजार कोटी रुपयांचे ९ प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी येथे दिली. यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी’ स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि रेल्वेमंत्री प्रभू यांच्यात राज्यातील प्रकल्पांसह मुंबईतील सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड, चर्चगेट-विरार एलिव्हेटेड, हार्बरवर कॅब सिग्नल यंत्रणा, सीएसटी स्थानकाचा विकास व एसंी लोकल यांच्यासह राज्यातील अनेक प्रलंबित प्रकल्प या विषयी आढावा बैठक पार पडली. त्यावेळी उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी असलेले हे सर्व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वेला राज्य सरकारकडून सहकार्य मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले.
बहुचर्चित असा चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला कात्री देण्यात आल्याची चर्चा होती. एमआरव्हीसीकडूनही वान्द्रे ते विरार असा एलिव्हेटेड प्रकल्पच सध्या पूर्ण केला जाईल, अशी माहीती वारंवार देण्यात येत होती. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा एलिव्हेटेड प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये बांधला जाण्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये पहिला टप्पा वान्द्रे ते विरार आणि दुसरा टप्पा वान्द्रे ते चर्चगेट असा असेल. त्याचबरोबर सीएसटी ते पनवेल रेल्वे आणि रोड असा मल्टिमोडल एलिव्हेटेड कॉरीडोरही बांधताना या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी भूमिपूजन १५ आॅगस्टला करण्यावर चर्चा करण्यात आली. हे दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारचे सहकार्य मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले. हार्बर रेल्वेवर दर दोन मिनिटांनी लोकल चालविण्याचे नियोजन असून त्यासाठी कॅब सिग्नल यंत्रणा अंमलात आणली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सीएसटी स्थानकाचा विकास करणार असल्याची माहिती देतानाच त्याचा आराखडा तयार असल्याचे सांगितले. या आराखड्यानुसार आपत्कालिन परिस्थीतीत सुमारे सात हजार लोक थांबू शकतील, अशी व्यवस्था असेल. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही उभारण्यात येणार असल्याचे प्रभू म्हणाले.
या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुंबई प्रादेशिक विकास महामंडळाचे आयुक्त यू.पी. एस. मदान, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव प्रवीण दराडे, सचिव मिलिंद म्हैसकर, आ. आशीष शेलार, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
.........................................

काय मिळणार उपनगरीय प्रवाशांना
-मुंबईतील रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा, स्वच्छतागृह, सरकत्या जीन्याचे काम १५ आॅगस्ट पर्यंत सुरु करुन टप्प्या टप्प्याने प्रत्येक स्टेशनला ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबईतील पंधरा स्थानकांवर वायफाय सुविधा तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण २0 स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात येतील.
- मुंबईमध्ये रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट, शेअर टॅक्सी या सर्व प्रवास सेवांचे एकाच ठिकाणी तिकिट उपलब्ध होण्यासाठी सिंगल तिकिट सिस्टिम सुरु करण्यात येणार आहे. ही सुविधा मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध करुन देण्यात येईल.
- मुंबई-दिल्ली अंतर कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर टायगोलेन रेल्वे सुरू करण्यात येणार असून यामुळे जवळपास सहा तासांचे अंतर कमी होईल. राज्यातील ४० स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
- जूनपर्यंत हार्बर मार्गावर सर्व गाड्या बारा डब्यांच्या
- एमयुटीपी-३ च्या कामांना १५ आॅगस्टपर्यंत सुरुवात करणार
- गेली वीस वर्ष जे रेल्वेचे प्रकल्प रखडले आहेत, ते एसपीव्ही च्या माध्यमातून फास्ट ट्रॅक करणार

 

Web Title: Rail development in the state is now on the fast track!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.