रुळाला तडा जाऊन रेल्वे विस्कळीत
By Admin | Published: January 12, 2015 03:24 AM2015-01-12T03:24:38+5:302015-01-12T03:24:38+5:30
खोपोली व लौजी रेल्वेस्थानकादरम्यान तांबडी वसाहतीजवळ रेल्वे रुळास तडा गेल्याने खोपोली-कर्जत रेल्वे वाहतूक रविवारी विस्कळीत झाली.
खोपोली : खोपोली व लौजी रेल्वेस्थानकादरम्यान तांबडी वसाहतीजवळ रेल्वे रुळास तडा गेल्याने खोपोली-कर्जत रेल्वे वाहतूक रविवारी विस्कळीत झाली. एका जागरूक नागरिकाने वेळीच याबाबत खोपोली रेल्वे स्थानकात खबर दिल्याने संभाव्य धोका टळला.
तांबडी वसाहतीजवळ रेल्वे रुळास तडा गेल्याची बाब एका जागरूक नागरिकाने सकाळी ८.२५च्या सुमारास खोपोली रेल्वे स्थानकात दिली. त्यामुळे कर्जतहून खोपोलीकडे येणारी सकाळची ८.४०ची लोकल खोपोलीच्या अलीकडे वासरंग रेल्वे फाटकापर्यंत थांबविण्यात आली. बराच वेळ खोपोली स्थानकात रेल्वे न आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. युद्धपातळीवर रुळाची दुरुस्ती केल्यानंतर पाऊण तासाने लोकल खोपोली स्थानकात आली. त्यानंतरही खोपोली-कर्जत रेल्वेसेवा विस्कळीत राहिली. दुपारी ३ वाजता येणारी लोकल न आल्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर अंबरनाथहून विशेष लोकल खोपोलीकडे सोडण्यात आली. ४.२० वाजता सीएसटीसाठी लोकल सोडण्यात आली. (वार्ताहर)