रेल्वे ठप्प करणारे अटकेत
By admin | Published: July 2, 2016 05:08 AM2016-07-02T05:08:32+5:302016-07-02T05:08:32+5:30
पश्चिम रेल्वेच्या माहीम येथील वीज उपकेंद्रातून बॅटऱ्या चोरून तीन तास लोकल ठप्प करणाऱ्या तीन चोरांना अटक करण्यात आली
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या माहीम येथील वीज उपकेंद्रातून बॅटऱ्या चोरून तीन तास लोकल ठप्प करणाऱ्या तीन चोरांना अटक करण्यात आली आहे. या चोरांनी पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य आणि कोकण रेल्वे मार्गांवरही बॅटऱ्यांची चोरी केल्याचे आरपीएफच्या (रेल्वे सुरक्षा दल) तपासात उघडकीस आले. यातील मुख्य आरोपी हा रेल्वेचाच जुना कंत्राटदार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली.
१९ जूनच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेच्या माहीम येथील वीज उपकेंद्रातून १८ बॅटऱ्यांची चोरी करण्यात आली होती. त्यामुळे २0 जून रोजी सकाळपासून पश्चिम रेल्वेची संपूर्ण लोकल सेवा ठप्प झाली आणि ७0 फेऱ्या रद्द करण्याबरोबरच अनेक लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला होता. या घटनेनंतर रेल्वे मालत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. रेल्वे सुरक्षा दलाकडून या घटनेची गंभीर दखल घेत बॅटरी चोरांचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर, नालासोपारा पूर्व येथून आसिक नावाच्या व्यक्तीला पकडण्यात आले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर अनुप पासवान या त्याच्या सहकाऱ्याचीही माहिती मिळाली आणि त्यालाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांनी बॅटऱ्या वसई येथील अब्बू हरेरा याच्या भंगारात विकल्या, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी दिली. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून आणखी माहिती मिळविण्यात येत आहे. त्यापूर्वी १ जून रोजीच्या मध्यरात्रीही त्याच ठिकाणी पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेच्या वीज उपकेंद्रातून मिळून एकूण ११0 बॅटऱ्यांची त्यांनी चोरी केली होती. आसिक हा सराईत गुन्हेगार असून, त्याने आणि सहकाऱ्यांनी पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर अनेक बॅटऱ्यांची चोरी केल्याचे झा म्हणाले. आसिक हा रेल्वेचा जुना कंत्राटदार आहे. या प्रकरणी फिरोज आणि कद्दू नावाच्या आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
>१ जूनच्या मध्यरात्री माहीम येथील वीज उपकेंद्राचा टाळा तोडून ११0 बॅटऱ्या चोरल्या आणि त्या सर्व बॅटऱ्या टेम्पोत टाकून पळवल्या. त्यांची भंगारात २४ हजार रुपयांना विक्री केली.
१९ जूनच्या मध्यरात्री
याच केंद्रातून आणि त्याच्या बाजूच्याच असलेल्या मध्य रेल्वेच्या वीज केंद्रातून एकूण १८ बॅटऱ्या चोरल्या. त्यांची १८ हजार रुपयांना भंगारात विक्री केली.
>सर्वांत जास्त चोऱ्या पावसाळ्यात
रेल्वे मालमत्तांच्या सर्वांत जास्त चोऱ्या या पावसाळ्यात होतात. यात बॅटरी, केबलच्या चोऱ्या अधिक होत असल्याची माहिती देण्यात आली. मागच्या १० दिवसांत आणखी दोन बॅटऱ्यांची चोरी झाली आहे. पावसाळ्यात ट्रॅकवर रेल्वे कर्मचारी कमी प्रमाणात जातात. हीच बाब हेरून बॅटऱ्या चोरण्यात येतात, असे झा यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ४0४ चोरांना अटक
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गांवर २0१४पासून आतापर्यंत रेल्वेची मालमत्ता चोरणाऱ्या ४0४ चोरांना अटक करण्यात आली आहे. यात २0१४मध्ये १४७, २0१५मध्ये १८९ आणि २0१६मध्ये ६८ चोरांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. तर १४ लाख ६१ हजारांची मालमत्ता चोरीला गेली आहे.