स्वतंत्र विदर्भासाठी रेल रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 03:17 PM2017-04-06T15:17:32+5:302017-04-06T16:32:27+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती व शेतकरी कर्जमुक्तीसाठी गुरुवारी वर्ध्यातील सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
नागपूरकडून माल गाडी येताच कार्यकर्त्यांनी त्या दिशेने धाव घेत तिला अर्धा तास रोखून धरले. सुमारे १५ मिनिटानंतर चंद्रपूरकडून आलेली सुपर एक्स्प्रेस सेवाग्राम रेल्वे स्थानकावर थांबली असता तिलाही सुमारे १५ मिनिटे रोखून धरली. दरम्यान, ह्यविदर्भ आमच्या हक्काचा ...ह्ण अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सेवाग्राम रेल्वे स्थानकाचा परिसर व्यापून टाकला होता. कार्यकर्त्यांच्या हातातील विदर्भाचा नकाशा व त्यावर जय विदर्भ नमुद असलेले फलक लक्ष वेधून घेत होते. या आंदोलनाने स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा एकदा बुलंद केली.
या आंदोलनात चंद्रपूरहून माजी विधानसभा उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, अॅड. गोविंद भेंडारकर, प्रभाकर दिवे, वर्धेतून माजी आमदार सरोजताई काशीकर, निळकंठ घवघवे, मधूकर हरणे, गंगाधार मुटे, शैलाताई देशपांडे, उत्तम देवधे, सतीश दाणी, नागपूरहून अरुण केदार, अरविंद देशमुख, धर्मराज रेवतकर, निलकंठ घवघवे, डॉ. दीपक मुंढे, यवतमाळहून विजय निवल, अॅड. अजय चमेडिया, गडचिरोलीहून राजेंद्रसिह ठाकूर, गोंदियाहून अॅड. अर्चना नंदघले, अमरावतीहून दिलीप भोयर, वाशिमहून ओमप्रकाश तापडिया असंख्य कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.
आंदोलन अतिशय शांततामय पद्धतीने पार पडले असले तरी रेल्वे स्थानक ते एसटी विभाग नियंत्रक कार्यालय या सुमारे दीड किमी अंतरावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे स्वत: आंदोलनावर नियंत्रण ठेवून होते. आंदोलनाचे स्वरुप विचारात घेता पोलिसांनी सकाळपासूनच सेवाग्राम रेल्वे स्थानक व परिसरात सुमारे ५०० पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये पोलीस अधीक्षक गोयल यांच्यासह पोलीस उपअधीक्षक(गृह) रवींद्र किल्लेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, पोलीस निरीक्षक पराग पोटे, विजय मगर, राजेंद्र शिरतोडे, सहायक पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर ही मंडळी पोलीस ताफ्यासह प्रत्येक घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते. मुंबईहून रेल्वे सुरक्षा विशेष बलाची ७० जवानांची तुकडी तैनात करण्यात आली होती. नागपूरहूनसुद्धा पोलिसांची कुमक मागविण्यात आली
होती. आंदोलन शांततामय मार्गाने पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वासघेतला.
विदर्भवाद्यांच्या सहा प्रमुख मागण्या
- स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरीत निर्माण करा.
- शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा.
- मायक्रो फायनांसतर्फे कर्जवसुलीसाठी सुरू असलेले महिलांच्या गटाचे शोषण थांबवा.
- विदर्भातील तरुणांना महाराष्ट्रातील विदर्भाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात
अधिकार म्हणून शासकीय नोकऱ्या द्या.
- महावितरणने केलेली अन्यायपूर्ण १२ टक्केची दरवाढ कमी करा.
- ५० टक्के नफ्यासह शेतमालाला किफायतशीर भाव द्या.
वेगळा विदर्भ हा केंद्र सूचीतला विषय आहे म्हणून सरळ केंद्राला सरळ निरोप द्यायचे काम झालेले आहे. आता सगळ्या जनतेच्या स्वाधीन हे आंदोलन करतो. आता पुढील जबाबदारी केंद्र सरकारची आहे.
- अॅड. वामनराव चटप, विदर्भ आंदोलनाचे नेते.