रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य!
By Admin | Published: May 23, 2017 03:29 AM2017-05-23T03:29:13+5:302017-05-23T03:29:13+5:30
रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य आहे, असे सांगत ‘रेल बढे, देश बढे’ असा उद्घोष रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुुंबई : रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य आहे, असे सांगत ‘रेल बढे, देश बढे’ असा उद्घोष रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केला. सोमवारी दादर येथे मध्य आणि हार्बर रेल्वेवरील स्थानकांतील प्रवासी सेवांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी देशातील सर्वात जलद ‘तेजस’ एक्स्प्रेसला (मुंबई-करमळी) त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
देशातील ४० हजारांपेक्षा जास्त रेल्वे डब्यांत सुरक्षिततेच्या दृष्टीने काही त्रुटी आहेत. तीन वर्षांत ही सगळी कामे उरकणे शक्य झाले नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असे ४० हजार नवे डबे सेवेत आणणार आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे आहे. शंभराहून अधिक स्थानकांतील वाय-फाय सुविधा दोन वर्षांत ४०० स्थानकांमध्ये देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगासाठी १५० शौचालये बांधण्यात येणार आहेत, अशी माहितीही प्रभू यांनी दिली.
नेत्यांची मंदियाळी : कार्यक्रमाला खासदार अरविंद सांवत, गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, हुसैन दलवाई, किरीट सौमय्या, डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. त्याचबरोबर, ‘मरे’चे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, ‘परे’चे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, आरसीएफ महाव्यवस्थापक आर.पी.नि. बरिया, एमआरव्हीसीचे सीएमडी प्रभात सहाय, आयआरसीटीसीचे सीएमडी ए. के. मनोचा उपस्थित होते.
३५ मिनिटांचा लेटमार्क
‘तेजस’ एक्स्प्रेसला पहिल्याच दिवशी ३५ मिनिटांचा लेटमार्क लागला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विमानाला विलंब झाल्यामुळे त्यांना दादर येथे पोहोचण्यास उशीर झाला. मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचताच रेल्वेमंत्र्यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत, ‘तेजस’ला हिरवा झेंडा दाखवला.
‘महाराज’ म्हणा : कर्नाटक येथील ‘जय महाराष्ट्र’ वादाचा दाखला देत, खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मराठी शिका आणि मराठीतच बोला, असा सज्जड दम दिला. त्याचबरोबर, सूत्रसंचालन करणाऱ्याला छत्रपती शिवाजी ‘महाराज’ टर्मिनस असा उल्लेख करा, अशी आठवण केली. या वेळी रेल्वेने डबलडेकर ट्रेनबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, ‘तेजस’ला कणकवली येथे थांबा देण्याची मागणी सावंत यांनी या वेळी केली.