रेल्वे होमगार्डच्या बनावट हजेरीचा मोठा घोटाळा उघड

By Admin | Published: November 2, 2016 05:37 AM2016-11-02T05:37:42+5:302016-11-02T05:37:42+5:30

लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रेल्वेमध्ये नेमण्यात येणाऱ्या होमगार्ड्सबाबत मोठा घोटाळा उघडकीस आला

The Railway Home Guard's fake attendance scandal exposed | रेल्वे होमगार्डच्या बनावट हजेरीचा मोठा घोटाळा उघड

रेल्वे होमगार्डच्या बनावट हजेरीचा मोठा घोटाळा उघड

googlenewsNext

जमीर काझी,

मुंबई- लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रेल्वेमध्ये नेमण्यात येणाऱ्या होमगार्ड्सबाबत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बंदोबस्ताची ड्यूटी नसताना दैनंदिन भत्त्यासाठी बनावट हजेरीपत्रके बनवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. हा नेमका आकडा निश्चित झालेला नसला तरी ही रक्कम लाखोंच्या घरात असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
गृहरक्षक दलाच्या जवानांसह रेल्वे पोलीस व होमगार्डच्या मुख्यालयातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. होमगार्ड कर्तव्यावर हजर नसताना त्यांची अधिक दिवस हजेरी दाखवून ही रक्कम उकळण्यात आली आहे.
होमगार्ड महासमादेशकांकडे आलेल्या एका तक्रारीवर झालेल्या तपासात जानेवारी २०१४ मध्ये बनावट हजेरीपत्रकाद्वारे हजारो रुपये भत्त्याच्या रुपात उकळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबत रेल्वे पोलिसांकडे फिर्याद करण्यात आली आहे. अशाच प्रकारे अन्य महिन्यांची बनावट हजेरी देयके बनवून सरकारी रकमेची लूट झाल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना मानधन तत्त्वावर मदत करणारी ‘होमगार्ड’ही यंत्रणा गृह विभागाच्या अखत्यारित स्वतंत्रपणे कार्यरत आहे. होमगार्ड्सकडे पोलिसांइतके अधिकार नसले तरी महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी त्यांची नेमणूक केली जाते. त्या बदल्यात १० तासांच्या ड्यूटीसाठी एका होमगार्डला दिवसाला ३५० रुपये मानधन दिले जाते. त्यांची हजेरी संबंधित नियुक्तीच्या परिसरातील पोलीस ठाण्यातून नोंदविली जाते. त्यांच्याकडून दर महिन्याला देयक बिल आल्यानंतर ते होमगार्डच्या कार्यालयात पाठवून मंजूर केली जातात. २०१४ च्या जानेवारी महिन्यात रेल्वेमध्ये नेमणुकीला असलेल्या होमगार्डच्या हजेरी भत्त्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार विभागाचे महासमादेशक राकेश मारिया यांच्याकडे आली होती. त्यावर उपमहासमादेशक संजय पांडे यांच्या सूचनेनुसार या प्रकरणी समिती नेमून सविस्तर चौकशी करण्यात आली आहे. रेल्वेतील विविध पोलीस ठाण्यांकडून दाखल झालेली बनावट हजेरीपत्रके, देयके व त्यासाठी संबंधित होमगार्ड, पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि गृहरक्षक दलातील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई विभागाचे समादेशक विद्यासागर भोले यांनी रेल्वे पोलीस (जीआरपी) कडे फिर्याद दिली आहे.
>संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा
होमगार्डची बनावट हजेरी प्रमाणपत्र व देयकामध्ये तफावत मोठी तफावत आहे. त्यात चौकशी समितीने दोषी ठरविलेल्यांवर कारवाईची शिफारस केली आहे. या फसवणुकीप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे रीतसर फिर्याद दाखल केली आहे. मुुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत नेमणुकीला असलेल्या होमगार्डच्या बाबतीत असा गैरव्यवहार झाल्याच्या शक्यतेने त्यांनाही तपास करण्याबाबत कळविलेले आहे. विभागाकडून याप्रकरणी पाठपुरावा केला जात आहे.
- संजय पाडे, उपमहासमादेशक, गृहरक्षक दल व नागरी सेवा
>अशी झाली फसवणूक
रेल्वेला जानेवारी २०१४ महिन्यात पुरविण्यात आलेल्या बंदोबस्तात होमगार्डच्या हजेरी प्रमाणपत्रात सीएसटी, मुंबई सेंट्रल व वडाळा रेल्वे स्टेशन या ठिकाणच्या काही गार्डची हजेरी, प्रत्यक्षात उपस्थिती व सादर केलेल्या देयकामध्ये मोठी तफावत आहे.
>या गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी समितीने विविध परिमंडळांतील क्षेत्र समादेशक अधिकारी नलिनी पाटकर, एस. एच. वाडेकर, तोरस्कर, पी. एन. पाटील, एम. एन. पांचाळ, यू. जी. पाटील तसेच बिले बनविणारे निलेश जाधव, महिला होमगार्ड कौमुदी बसनाक, संचित साळवी, पलटन नायक रमेश सुर्वे, उषा देवकुळे, व्ही. टी. शिंदे यांना दोषी ठरविले आहे.
काही पोलीस ठाण्याच्या ठिकाणी होमगार्ड २० दिवस हजर असताना २८ दिवस, तर काही ठिकाणी २२ च्या जागी २६ व ३० दिवसांची हजेरीची बिले बनवून अतिरिक्त भत्ता लुटण्यात आल्याचे समितीच्या अहवालात नमूद केले आहे.

Web Title: The Railway Home Guard's fake attendance scandal exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.