रेल्वेत अडीच लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: November 15, 2015 11:29 PM2015-11-15T23:29:14+5:302015-11-15T23:36:57+5:30
पोलिसांत गुन्हा : जयपूर, जोधपूर-बंगलोर एक्स्प्रेसमध्ये चोरी
मिरज : जयपूर-बंगलोर व जोधपूर-बंगलोर एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन प्रवाशांचा अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या रेल्वेगाड्यांत प्रवाशांची गर्दी असल्याने चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. जयपूर-बंगलोर विशेष एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी वातानुकूलित बोगीतून महिला पत्रकाराचे दोन लाखांचे दागिने चोरून नेले.
शनिवारी पहाटे मिरजेकडे येणाऱ्या जयपूर-बंगलोर या दिवाळी सुटीनिमित्त सोडण्यात आलेल्या विशेष एक्स्प्रेसमध्ये ए-१ वातानुकूलित बोगीतील दीपा अमितकुमार श्रीवास्तव (वय २८, रा. बंगलोर) या महिला पत्रकार पतीसह वसई ते बंगलोर प्रवास करीत असताना लोणावळा ते सातारादरम्यान त्यांच्या पर्समधील दागिने अज्ञातांनी चोरले. सातारा स्थानक सोडल्यानंतर पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर दीपा श्रीवास्तव यांनी रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला चोरीबाबत माहिती दिली. जयपूर एक्स्प्रेस मिरजेत आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी चोरीची तक्रार नोंद केली. श्रीवास्तव दाम्पत्य झोपेत असताना त्यांच्या पर्समधील अडीच तोळे हिरेजडीत मंगळसूत्र, चार अंगठ्या, (पान १ वरुन) चार कर्णफुले असा आठ तोळे सोन्याचा दोन लाख पाच हजारांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार आहे. दिवाळी सुटीच्या हंगामात आरक्षित व जनरल बोगीत गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होत आहेत. मात्र, वातानुकूलित बोगीतही चोरट्यांनी डल्ला मारल्याने पोलीस चक्रावले आहेत. जोधपूर-बंगलोर एक्स्प्रेसच्या आरक्षित बोगीतून अहमदाबाद ते पुणे प्रवास करणारे बंगलोरचे व्यापारी नवीनकुमार रतनचंद जैन (वय ५०) यांची बॅग चोरट्यांनी लोणावळा ते पुणेदरम्यान चोरून नेली. बॅगेत बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल, रोख दोन हजार, कपडे असा १५ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज होता.
चोरीबाबत जैन यांनी मिरज रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली आहे. जोधपूर एक्स्प्रेसमध्येच प्रवास करणारे प्रशांत पांडे (४२, रा. बंगलोर) यांचीही बॅग चोरट्यांनी लंपास केली.
बॅगेत सोन्याचे नाणे, रोख रक्कम असा
१६ हजार ५०० रुपयांचा माल होता. रेल्वेच्या आरक्षित बोगीसह वातानुकूलित व सर्वसाधारण बोगीतही चोऱ्या होत असल्याने एक्स्प्रेसमधून रात्रीचा प्रवास प्रवाशांना चांगलाच महागात पडत आहे.
दिवाळी सुटीत परतीच्या प्रवासासाठी रेल्वेला मोठी गर्दी असल्याने लोणावळा ते पुणेदरम्यान रेल्वे प्रवाशांचे साहित्य चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. दरवर्षी दिवाळीच्या हंगामात प्रवाशांचे साहित्य चोरणाऱ्या टोळ्या रात्रीच्या रेल्वेगाड्यांत धुमाकूळ घालत आहेत. एक आठवड्यापूर्वी जोधपूर एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी प्रवाशांच्या बॅगा लंपास करून लाखोंचा ऐवज चोरला होता. मात्र, रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाने चोऱ्यांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना केली नसल्याने त्यानंतर पुन्हा चोऱ्यांचे प्रकार घडले आहेत. रात्रीच्या रेल्वेगाड्यांत सशस्त्र पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचा बंदोबस्त असतानाही चोऱ्यांचे
प्रकार सुरूच आहेत. गतवर्षीही दिवाळी
हंगामात चोरट्यांनी रात्रीच्या रेल्वेगाड्यांत महिनाभर धुमाकूळ घालून प्रवाशांची लूटमार केली होती.
धावत्या रेल्वेत फिर्याद
रेल्वे पोलिसांनी मिरज ते बेळगावदरम्यान धावत्या रेल्वेत श्रीवास्तव यांची चोरीची फिर्याद घेतली. दीपा श्रीवास्तव यांनी वातानुकूलित बोगीतील रेल्वे कर्मचारी व प्रवाशांवर चोरीचा संशय घेतल्याने मिरजेतून बेळगावपर्यंत पोलिसांनी सर्व प्रवाशांच्या सामानाची झडती घेतली, मात्र चोरीला गेलेले दागिने सापडले नाहीत. जयपूर एक्स्प्रेसच्या आरक्षित वातानुकूलित बोगीतून प्रवास करणारा कोणताही प्रवासी साताऱ्यापासून उतरलेला नाही. त्यामुळे पुणे स्थानकापूर्वी चोरीचा प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशय आहे.