रेल्वेमंत्री, हे तुम्ही कराच...!

By admin | Published: January 9, 2015 11:56 PM2015-01-09T23:56:42+5:302015-01-09T23:56:42+5:30

अपेक्षा : कणकवली, सावंतवाडी, कुडाळच्या समस्या सोडवा

Railway Minister, you can do this ...! | रेल्वेमंत्री, हे तुम्ही कराच...!

रेल्वेमंत्री, हे तुम्ही कराच...!

Next

कणकवली/सावंतवाडी/कुडाळ : कोकणचे सुपुत्र आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याकडून कोकणातील रेल्वे प्रवाशांकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची घोषणा प्रभू यांनी केल्यामुळे कोकणवासीयांच्या अपेक्षांची पूर्ती होताना दिसत आहे. असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक समस्यांकडे रेल्वेमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.
कणकवली : कणकवली रेल्वेस्थानक हे जिल्ह्यातील एकमेव शहरातले स्थानक असून ते अधिक गल्ला गोळा करून देणारे स्थानक ठरले आहे. प्रायोगिक तत्त्वावर कणकवली येथे सर्व गाड्यांना थांबा उपलब्ध करून दिला तर त्यामुळे या परिस्थितीत बदल घडू शकतो. रस्ते वाहतुकीचे नेटवर्क कणकवलीतून आहे तसे अन्य कोणत्याही स्थानकातून नाही. त्यामुळे पर्यटकांना वेळ न दवडता जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळी जाणे शक्य होईल.
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून १९९७ मध्ये घोषित झाला. परंतु पर्यटक यावेत अशी कोणतीही व्यवस्था कोकण रेल्वे पर्यायाने रेल्वे बोर्ड करू शकले नाही. कोकण रेल्वे मार्गावरून आज ३२ ट्रेन्स दोन्ही दिशांनी धावतात. परंतु पाच ते सहा गाड्या वगळता बहुसंख्य गाड्यांना सिंधुदुर्गात कोठेच थांबा नाही. त्यामुळे दिल्ली, मुंबई, गुजरात व देशाच्या भागातून येणारा पर्यटक थेट गोव्यात उतरतो. तेथून तो अन्य वाहतुकीने सिंधुदुर्गात येण्याचा विचारही करत नाही. पर्यटकच नसल्याने सिंधुदुर्गातील व्यावसायिक किंवा अन्य यंत्रणेने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली तरी योग्य आर्थिक परतावा मिळत नसल्याने पदरी निराशाच पडते. नांदगाव स्थानकावर मालवाहतुक केंद्र करण्याच्या दृष्टीने मूळ आराखड्यात तरतूद झालेली आहे. परंतु गेल्या सतरा वर्षांत त्या दृष्टीने कोणतीही हालचाल झालेली नाही. मालवाहतुक केंद्र सुरू झाल्यास कोकणच्या सुप्रसिद्ध हापूस आंब्याच्या मार्केटला प्रतिदिनी जाणारा २०० ट्रक आंबा किमान तीन महिने कोकण रेल्वेला निश्चित उत्पन्न मिळवून देऊ शकेल. प्रत्यक्ष गाड्या चालवणाऱ्या मोटरमनची चर्चा केली असता असे जाणवते की प्रलंबिंत स्थानकांमुळे एकेरी मार्गावरून क्रॉसिंगसाठी जास्त वेळ वाया जाऊन नेहमीच कोकण रेल्वे विलंबाने धावते असे चित्र निर्माण होते. त्यामुळे प्रस्तावित परंतु प्रलंबित चिंंचवली, कसाल आदी स्थानके उभारली गेली तर एकेरी रूळावरूनही विनाविलंब गाड्या धावू शकतील. कणकवलीत रेल्वे अपघातांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र उभारण्याची गरज आहे. रेल्वे ट्रॅकची आणि कोसळणाऱ्या दरडींपासून सुरक्षितता देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)

मळगाव येथे होणार टर्मिनस, अपेक्षापूर्तीकडे रेल्वेमंत्र्यांची वाटचाल
सावंतवाडी : कोकण रेल्वेचे शेवटचे टोक म्हणून सिंधुदुर्ग मधील मळगाव हे रेल्वेस्टेशन पाहिले जाते.
मळगाव येथे रेल्वेचे टर्मिनस करण्यात यावे, यासाठी पहिल्यापासूनच जोर दिला. त्यासाठी लागणारी पुरेसी जागा ही उपलब्ध करून दिली. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी २०१२ मध्ये नारायण राणे व रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन मळगाव येथे पुरेसी जागा नसल्याचे कारण देत रेल्वे टर्मिनस करता येणार नाही, असा पवित्रा घेतला.
त्यावेळी रेल्वे टर्मिनससाठी मडुरा रेल्वे स्थानकाचा पर्याय पुढे आला. मडुरा येथे मोठ्या प्रमाणात जागा आहे. त्यामुळे तेथेच व्हावे, अशी अपेक्षा काँग्रेसने लावून धरली. मात्र, या मागणीला काँॅग्रेस वगळता सर्वपक्षांनी विरोध केला.
भाजपप्रणित शासन आले आणि सिंधुदुर्गचे सुपूत्र नवे रेल्वेमंत्री झाले. त्यांनी गोव्यात रेल्वेच्या कार्यक्रमात सावंतवाडी येथेच टर्मिनस होणार, असे जाहीर केले. त्यानंतर पुन्हा सावंतवाडीच्या नावाला जोर आला असून आता तर सावंतवाडी मळगाव या रेल्वे स्थानकावर टर्मिनस होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. काँॅग्रेसनेही त्यामुळे यातून काढता पाय घेतला असून मळगावला सर्व स्तरातून पंसती मिळत आहे.

कणकवली
सर्व गाड्यांना थांबा मिळावा
नांदगाव स्थानकावर मालवाहतूक केंद्र सुरु करा
गोव्यात येणारे पर्यटक कोकणात वळविण्यासाठी प्रयत्न व्हावेत
कोकण रेल्वे विनाविलंब धावण्यासाठी प्रस्तावित परंतु प्रलंबित चिंंचवली, कसाल आदी स्थानके उभारावीत
आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र उभारण्याची गरज
रेल्वे ट्रॅक आणि कोसळणाऱ्या दरडींपासून सुरक्षितता देण्यासाठी ठोस उपाययोजनेची आवश्यकता
रेल्वेसुरक्षेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज
स्थानकावरील दोन्ही प्लॅटफॉर्मवर शेडची आवश्यकता
नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस यांना कायम थांबा द्या
कोकणी मेव्याला जागा द्यावी तसेच सुसज्ज रेस्टॉरंट उभारण्याची गरज


सावंतवाडी
सावंतवाडीत नेत्रावती, मत्स्यगंधा जनशताब्दी या गाड्यांना थांबा द्या
पुण्याकडे जाणारी रेल्वे सावंतवाडीतून सोडावी.
दादरहून सावंतवाडीकडे येणाऱ्या रेल्वेचे एकच वेळापत्रक ठेवावे
डबल ट्रॅक करण्यात यावा
सावंतवाडी रेल्वे स्थानकात कर्मचारी संख्या वाढवावी. सध्या येथे दोनच कर्मचारी काम पाहतात
सावंतवाडी रेल्वे स्थानकात दूरध्वनी उचलला जात नसल्याने अनेकवेळा वाद होतात
रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितता नाही. अनेकवेळा चोरीसारखे प्रकार घडले आहेत.
सावंतवाडी रेल्वे स्थानकात बुकिंग सेवा करण्यात यावी, त्यासाठी कुडाळला जावे लागते
सावंतवाडी टर्मिनस करीत असताना प्राथमिक सुविधा हव्यात
कोकणी मेव्यासाठी अधिकाधिक दुकानांना रेल्वे स्थानकात परवानगी देण्यात यावी.



कुडाळ रेल्वेस्थानक : गैरसुविधांकडेही लक्ष हवे
रजनीकांत कदम ल्ल कुडाळ
कुडाळ रेल्वेस्थानक अनेक असुविधांच्या गर्तेत अडकलेले असून जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या रेल्वेस्थानकाच्या सोयीसुविधांकडे रेल्वेमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. येथील प्रवाशांची संख्या जास्त असून त्यांना पुरेशा सुविधाही मिळत नाही, ही कोकण रेल्वेतील प्रवाशांची खंत आहे.
कुडाळ रेल्वे स्थानकावर नव्याने बांधलेले तिकीट घर हे प्लॅटफार्मच्या बाहेर बांधलेले आहे. प्लॅटफॉर्मवर दरवाजाही नाही. त्यामुळे तिकीट घरापासून प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर प्रवाशांची अवस्था वाईट होत असते. वृध्द, स्त्रिया, लहान मुले यांनाही रेल्वे पकडताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या रेल्वेस्थानकावर कधीतरी एखाद दुसरा रेल्वे पोलीस दिसतो. अपघात झाल्यास किंवा एखादी घटना घडल्यास राज्य शासनाच्या पोलिसांना धावपळ करावी लागते. कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून एमआयडीसीही आहे. येथूनच कोकण रेल्वेचा मार्ग जातो, नजीकच कुडाळ रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे कुडाळात रेल्वे कारखाना सुरू केल्यास जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या, रोजगार उपलब्ध होतील.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार पाहता, या जिल्ह्याला चांगल्या आरोग्य यंत्रणेची गरज आहे. रेल्वे अपघाताची शक्यता गृहित धरुन मध्यवर्ती ठिकाण म्हणून कुडाळ येथे रेल्वेचे हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. त्यावेळी बांधलेल्या रेल्वे स्थानकात बुकींग काऊंटरसाठी ५० ते ६० लोकांच्या रांगेला पुरेल, एवढीच जागा सोडलेली असते. आता मात्र कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढल्यामुळे बुकींग काऊंटरच्या बाहेर रस्त्यापर्यंत तिकिटासाठी गर्दीच्या रांगा लागतात, तसेच पावसाळ्यात प्रवाशांची हालत बिकट होते. प्रवाशांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी बुकींग काऊंटर सुधारणे आवश्यक आहे.

Web Title: Railway Minister, you can do this ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.