महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कमध्ये लवकरच ६,७२२ किलोमीटरची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 07:03 IST2021-02-11T05:09:20+5:302021-02-11T07:03:08+5:30
राज्यात ८७,००० कोटी रुपयांच्या ३९ रेल्वे प्रकल्पांचे काम सुरू

महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कमध्ये लवकरच ६,७२२ किलोमीटरची वाढ
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊननंतर रेल्वेने पुन्हा गती घेतली असून, महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कमध्ये लवकरच ६,७२२ किलोमीटरची वाढ होणार आले. राज्यात ३९ प्रकल्पांवर काम सुरू असून, यापैकी १०२६ किलोमीटरची वाहतूकही सुरू करण्यात आलेली आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, राज्यातील योजनांवर सुमारे ८७,००० कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. यात १६ नवीन लाइन, ५ वर रुंदीकरण व १८ मध्ये दुहेरी लाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी उघडल्या गेलेल्या १०२६ किलोमीटर रेल्वेलाइनसह या योजनांवर मागील वर्षी मार्च २०२० पर्यंत १७,८४१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी केलेल्या उपायांबाबत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात गोयल म्हणाले की, प्रकल्पांची प्राथमिकता, निधीच्या वाटपात वाढ, फिल्ड स्तरावर अधिकारांचा वापर, प्रकल्पांवर बारकाईने सतत देखरेख, भूमी अधिग्रहण व वनसंबंधी परवानगीचे काम लवकरात लवकर केले जात आहे. देशभरात ७.५लाख कोटी रुपयांच्या एकूण ५३,०३९ किलोमीटरच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे.
यातील ५१३ योजनांपैकी १८९ नव्या रेल्वेलाइन, ५४ रुंदीकरण व २७० किलोमीटरचे दुहेरीकरण सुरू आहे. यावर मागील वर्षी मार्चपर्यंत १.८६ लाख कोटी खर्च झाले व १०,०१३ किलोमीटरच्या लाइन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या.
१२६६.८ किलोमीटर प्रकल्पांत राज्याची भागीदारी
लोकसभेत गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील १२६६.८ किलोमीटर लांबीच्या ९ रेल्वे प्रकल्पांत राज्य सरकारची भागीदारी आहे. यातील २८४ किलोमीटरच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड व २६१ किलोमीटरची अहमदाबाद-बीड-परळी वैजनाथ नवी रेल्वेलाइन व ११६ किलोमीटरच्या नागपूर-नागभीरचाही समावेश आहे.