रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीला संमोहित करून लुटले

By admin | Published: January 20, 2017 02:05 AM2017-01-20T02:05:06+5:302017-01-20T02:05:06+5:30

रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीला संमोहित करून दीड लाख रुपयांचे दागिने व ५० हजार रुपये लुटण्यात आले.

The railway officer's wife was robbed and looted | रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीला संमोहित करून लुटले

रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीला संमोहित करून लुटले

Next

पतीवर संकट असल्याची दाखवली भीती : अजनी रेल्वे कॉलनीतील घटना
नागपूर : रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीला संमोहित करून दीड लाख रुपयांचे दागिने व ५० हजार रुपये लुटण्यात आले. ही घटना गुरुवारी दुपारी अजनी रेल्वे कॉलनीत घडली.
दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेत कार्यालय अधीक्षक असलेले दीपक कुमार सरवय्या हे रेल्वे कॉलनीत राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी शारदा, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दीपक कुमार हे नेहमीप्रमाणे सकाळी ड्युटीवर निघून गेले. मुलेही शाळेत गेली. घरी केवळ एकट्या शारदा होत्या. दुपारी १२.४५ वाजता ४५ ते ५० वर्षे वयोगटातील एक महिला त्यांच्या घरी आली. ही महिला बुधवारीसुद्धा आली होती. तेव्हा शारदा यांनी तिला परत पाठविले होते. आजही त्यांनी तिला परत जाण्यास सांगितले. परंतु तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत ती महिला शारदा यांच्याकडे पाहून ‘पतीवर संकट-पतीवर संकट’ असे बरळू लागली. शारदा यांच्यानुसार महिलेचे ते शब्द ऐकून त्यांना काहीच कळेनासे झाले. त्यानंतर ती महिला घरात आली. तिने शारदा यांना अंगावरील दागिने काढायला सांगितले. शारदा यांनी तिच्या म्हणण्याप्रमाणे बांगड्या, मंगळसूत्र काढून महिलेच्या हातात दिले. इतकेच नव्हे तर घरात ठेवलेले टॉप्स, मंगळसूत्र, अंगठी आणि ५० हजार रुपयेसुद्धा काढून दिले. पाऊण तासानंतर ती महिला त्यांच्या घरातून निघून गेली.
शारदा यांच्यानुसार दुपारी १.४५ वाजता फोन आला. फोनचा आवाज ऐकल्यावर अचानक त्यांचे लक्ष विचलित झले. त्या घडलेली घटना आठवू लागल्या. यादरम्यान मुलगीही शाळेतून घरी आली. त्यानंतर आपण फसवल्या गेल्याचे शारदा यांच्या लक्षात आले.
शारदा यांच्या सांगण्यानुसार ती महिला बुधवारीसुद्धा आली होती. तिने एक पुस्तक दाखवीत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु शारदा यांनी तिला बाहेरूनच परत पाठविले. त्या महिलेला यापूर्वी कधीही पाहिले नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्या महिलेच्या संपर्कात येताच त्यांना काहीच समजले नाही. ती जशी सांगत गेली तसेच त्या करीत गेल्या. शारदा यांना संमोहित करून लुटल्याचा संशय आहे. अजनी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

भीती दाखवून बनविले लक्ष्य
दीपक कुमार हे काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते. उपचारानंतर त्यांंची प्रकृती सुधारली होती. यावरून शारदा पतीच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहात होत्या. त्या महिलेने पतीवर संकट असल्याचे सांगितल्याने त्या विचलित झाल्या. या परिस्थितीत त्या महिलेला शारदा यांची मानसिक अवस्था माहिती असल्याचा संशय आहे. पोलीस तिचा शोध घेत आहे.

Web Title: The railway officer's wife was robbed and looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.