हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारमधील किळसवाणा प्रकार, बटाटे पायांनी तुडवतानाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 02:40 PM2018-02-16T14:40:52+5:302018-02-16T14:41:15+5:30
हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारमध्ये घडलेला अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
मुंबई- हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारमध्ये घडलेला अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पेन्ट्रीकारमध्ये जिथे प्रवाशांसाठी जेवण बनवलं जातं तिथे पायाने बटाटे तुडविले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारमध्ये प्रवाशांच्या जेवणासाठी वापरण्यात येणारे उकळलेले बटाटे पायांनी तुडवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. अहमदाबाद - हावडा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२८३३) ही रेल्वेगाडी अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे स्टेशनवर आली असता पेन्ट्रीकारमध्ये ठेकेदाराचा कर्मचारी चक्क पायानी उकळलेले बटाटे तुडवीत असल्याचे आढळून आलं.
या व्हिडीओमध्ये हा कर्मचारी जेवण बनविण्यासाठी वापरले जाणारे बटाटे पायाने तुडवताना स्पष्टपणे दिसत आहे. बटाटे पायाने तुडवितानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने रेल्वेतील अन्न खाण्यासाठी किती सुरक्षित यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. एकीकडे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरवत असल्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे मात्र खाद्य पदार्थ पुरविण्यासारख्या आवश्यक गोष्टींकडे अशाप्रकारे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे.
शहराच्या रेल्वेस्थानकावर दररोज ३ वाजून २५ मिनिटांनी येणारी अहमदाबाद एक्सप्रेस ८ फेब्रुवारी रोजी ४ तास उशिरा आल्याने ७:३० वाजता रेल्वे फलाटावर आली. धामणगाव रेल्वे स्थानकचे अधीक्षक कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार पुलगाव व तळणी रेल्वेमार्गाच्या मध्ये रेल्वे रुळाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दोन तासाचा ब्लॉक ठेवण्यात आला होता. त्यामुळे सर्वच गाड्या स्थानकावर उशिरा पोहचत होत्या.
मंगेश भुजबळ, पवन शर्मा हे नातेवाईकांना घेण्याकरिता रेल्वे स्थानकावर गेले असता पवन शर्मा व इतरांना पॅन्ट्री कोचमध्ये प्रवाशांच्या भोजनासाठी वापरात येणारी बटाटे अक्षरश: पायांनी तुडवताना बघितले. सर्व पाहत असताना त्यांनी स्वत:च्या मोबाईल फोनवर व्हिडीओ घेऊन हा प्रकार कैद केला. सदर प्रकार प्रवाशांच्या जीविताशी व आरोग्यासाठी हानिकारक असल्याने त्या विषयाची तक्रार केली आहे. असा प्रकार पुढे होऊ नये याची काळजी घेणे ही रेल्वे प्रशासनाची जवाबदारी आहे. तशी तक्रार रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.