‘बालक-पालक’भेटीत रेल्वे पोलिसांचे योगदान
By admin | Published: January 26, 2016 03:05 AM2016-01-26T03:05:06+5:302016-01-26T03:05:06+5:30
मुंबईचे आकर्षण, अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचा ओरडा यासह अनेक कारणांमुळे घरातून पळून आलेल्या किंवा पालकांसह रेल्वे स्थानकात येताच हरविलेल्या बालकांना
मुंबई : मुंबईचे आकर्षण, अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचा ओरडा यासह अनेक कारणांमुळे घरातून पळून आलेल्या किंवा पालकांसह रेल्वे स्थानकात येताच हरविलेल्या बालकांना (१८ वर्षांखालील) यशस्वीरीत्या त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याची कामगिरी जानेवारी महिन्यातील अवघ्या २४ दिवसांतच रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) पार पाडली आहे. यात १ हजार १0२ बालकांपैकी १ हजार १३ बालके स्वगृही परतल्याची माहिती देण्यात आली. यासाठी आॅपरेशन स्माइल नावाने ही कामगिरी पार पाडण्यात आली.
मुंबई उपनगरीय रेल्वेचा पसारा हा चर्चगेट ते डहाणू, सीएसटी ते कर्जत, आणि हार्बरपर्यंत आहे. या तीनही मार्गांवरून दररोज ७५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास करताना अनेक रेल्वे स्थानकांवर विविध कारणांमुळे कोणी घरातून पळून आल्याने तर गर्दीमुळे पालकांचा हात सुटल्याने बालके हरविल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) होते. २0१६मधील १ ते २४ जानेवारीपर्यंत तब्बल १ हजार १0२ मुले-मुली हरविल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे झाली.
मात्र याच २४ दिवसांत त्यांच्या पालकांशी संपर्क साधून १ हजार १३ मुला-मुलींना ताब्यात देण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे हरविलेल्यांमध्ये ७५३ मुलांचा तर ३४९ मुलींचा समावेश होता. मुंबई सेंट्रल आणि सीएसटी स्थानकात हरविलेल्या बालकांची सर्वाधिक
नोंद झाली आहे. मुंबई सेंट्रलमध्ये २६६ तर सीएसटी २३६ बालके हरविल्याची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. दादरमध्ये १५६ बालके हरविली होती.
बाल कल्याण समितीसमोर ८९ बालकांची हजेरी
१ हजार १0२ बालकांपैकी १ हजार १३ बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तर ८९ बालकांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)