रेल्वेने पाणी नेण्याचा प्रस्ताव गुंडाळला !
By Admin | Published: September 9, 2015 12:20 AM2015-09-09T00:20:40+5:302015-09-09T00:20:40+5:30
लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचा प्रस्ताव जवळपास गुंडाळल्यात जमा असून, इतर चार पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव
औरंगाबाद : लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचा प्रस्ताव जवळपास गुंडाळल्यात जमा असून, इतर चार पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी लातुरात रेल्वे स्थानक आणि विहिरींची पाहणी केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. लातूरला वेळेत पाणीपुरवठा होईल व तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा असेल, अशा पर्यायांचा विचार सुरू आहे. रेल्वेने पाणी देण्याचा शेवटचा पर्याय असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी स्पष्ट केले. प्रधान सचिवांनी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी पाहणी केली असली तरी त्यांच्याशी सुद्धा सर्व पर्यायांवर चर्चा करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव खर्चिक असल्याने इतर पर्याय निवडण्याच्या सूचना प्रशासनाला वरिष्ठांकडून मिळाल्या आहेत. दांगट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी लातूर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग अभियंत्यांची बैठक झाली. त्यात भंडारवाडी प्रकल्पाच्या योजनेसाठी ३० कोटींचा निधी देण्याचे ठरले. तेथून २ एमएलडी पाणीपुरवठा होणे शक्य आहे. मनपाने या योजनेसाठी निविदा काढल्या होत्या; परंतु ठेकेदार पुढे न आल्यामुळे जीवन प्राधिकरणाकडे योजनेचे काम देण्याचे ठरले.
एकीकडे दांगट यांनी रेल्वेचा पर्याय गुंडाळल्याचे संकेत दिले असतानाच पाणीपुरवठा विभागाचे राज्याचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी मंगळवारी रेल्वे स्थानक व रेल्वेने आणलेले पाणी ज्या विहिरीत टाकले जाणार आहे, त्या एस़आऱदेशमुख यांच्या शेतातील विहिरीची पाहणी केली. जलशुध्दीकरण केंद्र, बॅरेजस, भंडारवाडी मध्यम प्रकल्पाची पाहणी करण्यापूर्वी राजेशकुमार यांच्यासह शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली़ त्यातही रेल्वेच्या पाण्याबाबत चर्चा झाली. (प्रतिनिधी)
चार पर्याय
-नागझरी प्रकल्पात विहीर घेणे
-मांजरा धरणपात्रात विहिरी घेणे
-भंडारवाडीची रखडलेली योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करणे
-उस्मानाबाद येथून जलवाहिनीने पाणी आणणे
लातूरकरांना दररोज ५० एमलएलडी पाणी लागते. मात्र महिन्यातून दोन वेळा म्हणजे १०० एमएलडी पाणी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.