पाण्यासाठी मिरजेतून लातूरला धावणार रेल्वे

By Admin | Published: April 5, 2016 10:42 PM2016-04-05T22:42:05+5:302016-04-06T00:19:05+5:30

हिरवा कंदील : एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्याकडून यंत्रणेची पाहणी

Railway to run from Latur to Latur | पाण्यासाठी मिरजेतून लातूरला धावणार रेल्वे

पाण्यासाठी मिरजेतून लातूरला धावणार रेल्वे

googlenewsNext

मिरज : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्याला पाणी देण्यासाठी आता मिरजेतून रेल्वे धावणार आहे. मंगळवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मिरजेत जिल्हा प्रशासन व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या. महिला वबालकल्याणमंत्री व लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत मिरज रेल्वेस्थानकात पाणी वाहतूक व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली.
मिरज विश्रामगृहात झालेल्या बैठकीत महसूलमंत्री खडसे यांनी मिरजेतून तातडीने लातूरला पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. के. गरंडे यांना दिल्या. पंढरपुरातून लातूरला टँकरने पाणी नेण्यास रेल्वेने मान्यता दिली आहे. आता मिरजेतून पाणी नेण्यात येणार असल्याने रेल्वेच्या परवानगीचे आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्यात येतील. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मिरजेतील रेल्वेची पाणी योजना जलशुध्दीकरण केंद्राची त्यांनी माहिती घेतली. रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्राची उभारणी करणाऱ्या शशांक जाधव यांनी दररोज ४५ लाख लिटर क्षमतेच्या मिरजेतील रेल्वे पाणीपुरवठा योजनेतून दररोज ५० लाख लिटर पाणी उपसा व शुध्दीकरण करता येईल, असे सांगितले. मिरज रेल्वेस्थानक व कर्मचारी वसाहतीला दररोज १५ लाख लिटर पाणी लागते. उर्वरित पाणी टँकरव्दारे लातूरला पाठविता येणे शक्य असल्याचे सांगितले. प्रत्येकी २४ हजार लिटर क्षमतेचे ५० टँकर भरण्यासाठी आठ तास वेळ लागणार असल्याने एकाचवेळी २४ टँकर भरतील, अशा पाईपलाईनची व उच्च क्षमतेच्या पंपाची व्यवस्था करण्याच्या सूचना खडसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार रेल्वे यार्डात सुमारे एक किलोमीटर लांबीची पाईपलाईनची व्यवस्था करून टँकर भरण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने आठ दिवसांत पाणी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याने त्यांनी सांगितले.
वारणा धरणात पुरेसा पाणी साठा असून, पुढील सहा महिने पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याने लातूरला पाणी देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजीवकुमार, आमदार संभाजीराव पाटील, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता टी. पी. सूर्यवंशी, रेल्वेच्या बांधकाम विभागाचे अभियंता एस. नागराळे, स्थानक अधीक्षक व्ही. रमेश यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
\

दररोज पाणी जाणार : एकनाथ खडसे
मिरजेतील रेल्वेच्या जलशुद्धिकरण केंद्रातून दररोज ५० टँकरद्वारे सुमारे २५ लाख लिटर पाणी लातूरला नेण्यात येईल. लातूर येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. लातूरच्या पाणीटंचाईबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येईल; मात्र सद्य:स्थितीत मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महसूलमंत्री खडसे यांनी मंगळवारी मिरजेत पत्रकार परिषदेत दिली.
वारणा धरणात सहा महिने पुरेल एवढा ११ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. मिरजेत रेल्वेच्या पाणी योजनेतून टँकर भरण्याची व्यवस्था आहे. यातून दर तीन दिवसांनी लातूर शहराला पाणीपुरवठा होईल. मिरजेतून लातूरला रेल्वे पोहोचण्यासाठी दहा तास लागणार आहेत. मिरजेतून टँकरने पाणी नेण्यासाठी आवश्यक प्राथमिक बाबींची पूर्तता करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आठ दिवसांत रेल्वे टँकर उपलब्ध झाल्यानंतर लातूरला पाणीपुरवठा सुरु होईल.

Web Title: Railway to run from Latur to Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.