रेल्वे सुरक्षा बलाकडे नाहीत अग्निशमनचे नंबर
By admin | Published: August 27, 2016 03:22 AM2016-08-27T03:22:54+5:302016-08-27T03:22:54+5:30
विरारच्या रेल्वे सुरक्षा बलाकडे वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे क्रमांक नसल्याची माहिती समोर आली आहे.
विरार : विरारच्या रेल्वे सुरक्षा बलाकडे वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे क्रमांक नसल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात विरार रेल्वे स्थानकातील फलाटावर लागलेल्या आगीनंतर मदतीसाठी रेल्वे सुरक्षा बलाने अग्निशमन दलाऐवजी रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला पाचारण केले होते.
मागील सोमवारी विरारच्या फलाट क्रमांक १ वर शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी आग लागली होती. गर्दीची वेळ असल्याने एकच हलकल्लोळ उडाला होता. आग लागताच स्थानिक अग्निशमन दलाला पाचारण करणे आवश्यक असते. परंतु रेल्वे सुरक्षा बलाकडे स्थानिक अग्निशमन दलाचे नंबर नसल्याने त्याने आग लागल्यावर रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला या आगीबाबत कळवले. नियंत्रणकक्षाने पुढील हालचाली केल्या. सव्वा सात वाजता महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथक पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
आम्ही आपतकालीन परिस्थितीत स्थानिक यंत्रणांना संपर्क करत बसलो तर वेळ जातो. त्यामुळे आमच्या नियंत्रण कक्षाला कळवत असतो असे रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरिक्षक यशवंत प्रजापती यांनी सांगितले. नियंत्रण कक्षाला कळवल्यास तत्पर कारवाई होते असाही त्यांनी दावा केला.
यामुळे रेल्वे सुरक्षा बलाचाच हलगर्जीपणा आणि गलथान कारभार समोर आला आहे. जर रेल्वे सुरक्षा बलाने तात्काळ स्थानिक अग्निशमन दलाला पाचारण केले असते तर आणखी लवकर मदत मिळून आग लवकरच आटोक्यात आणता आली असती असे रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)