खोपोली मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प
By admin | Published: January 30, 2016 02:01 AM2016-01-30T02:01:56+5:302016-01-30T02:01:56+5:30
खोपोली-कर्जत रेल्वेमार्गावर पळसदरी ते केळवली स्थानकाच्या दरम्यान शुक्रवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने खोपोली, कर्जत, मुंबई मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.
खालापूर : खोपोली-कर्जत रेल्वेमार्गावर पळसदरी ते केळवली स्थानकाच्या दरम्यान शुक्रवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने खोपोली, कर्जत, मुंबई मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. ओव्हरहेड वायर तुटल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत एकही ट्रेन खोपोलीत आली नव्हती. तब्बल आठ तासांहून अधिक वेळ दुरुस्तीचे काम सुरू होते. कर्जतवरून पहिली ट्रेन दुपारी ३ वाजता खोपोलीत आली. ट्रेन बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
कर्जत येथून खोपोलीकडे येणारी ट्रेन पळसदरी व केळवली स्थानकांच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने थांबली. ट्रेनचा वेग अधिक असल्याने काही खांबही ओव्हरहेड वायरसोबत पडले होते. बंद पडलेल्या ट्रेनला डिझेल इंजिन लावून पळसदरी स्थानकात हलविण्यात आले. ओव्हरहेड वायर व खांब तुटल्याने खोपोली-कर्जत मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली होती. पडलेले खांब उभे करून ओव्हरहेड वायर जोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाला ८ तासांहून अधिक वेळ लागल्याने या मार्गावरील रेल्वेसेवा बंद होती. दुपारी दोन वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्जतवरून खोपोलीकडे पहिली ट्रेन सोडण्यात आली. खोपोलीकडे येणारी ट्रेन पळसदरी स्थानकात दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे खोपोलीचे स्टेशन प्रबंधक आर. सी. मीना यांनी सांगितले. (प्रतिनिधी)