लातूरसाठी मिरजहून रेल्वेने पाणी आणणार
By admin | Published: April 5, 2016 06:01 PM2016-04-05T18:01:56+5:302016-04-05T18:29:10+5:30
उन्हाळयाची तीव्रता वाढत चाललेली असताना दिवसेंदिवस लातूरमधील परिस्थिती गंभीर रुप धारण करु लागली आहे.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ५ - उन्हाळयाची तीव्रता वाढत चाललेली असताना दिवसेंदिवस लातूरमधील परिस्थिती गंभीर रुप धारण करु लागली आहे. लातूरमधील जलसाठे आटत चालले असून, अपु-या पाण्यामुळे लातूरच्या जनतेचे प्रंचड हाल होत आहेत. लातूरची पाण्याची गरज भागवण्यासाठी आता मिरजहून रेल्वेने पाणी आणण्यात येणार आहे. लातूरच्या दौ-यावर असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली.
एकनाथ खडसे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आज लातूरचा दौरा केला. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे लातूरला रेल्वेने पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसात दोन ट्रेनभरुन लातूरसाठी पिण्याचे पाणी आणले जाईल. लातूरमध्ये टॅंकरच्या पाण्यासाठी लोक रात्र-रात्र जागून काढत आहेत.
टँकरच्या पाण्यासाठी गावक-यांना वीस-वीस किमीपर्यंत पायपीट करावी लागत आहे. मिळणारे पाणी फक्त पिण्यासाठी पुरत असून, कपडे किंवा आंघोळीपुरताही पाणी मिळत नसल्याची तक्रार महिलांनी केली. लातूरप्रमाणेच परभणीमध्येही पाण्यावरुन हाणामारीचे प्रसंग उदभवू नये यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
मात्र यापरिस्थितीतही राजकरणही परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाचा राजकारण करत आहे. लातूरमध्ये पाण्यासाठी अनेकांनी आपले गाव सोडले आहे. पाण्याला जीवन का म्हणतात ? ती लातूरमधील परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात येईल.
( सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर)