रेल्वे घडविणार ऐतिहासिक गडकिल्ल्यांची सहल, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार शिवरायांचा वारसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 06:11 IST2025-04-12T06:10:50+5:302025-04-12T06:11:17+5:30
Indian Railway News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला १० दिवसांची पर्यटन सहल रेल्वेमार्फत आयोजित केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

रेल्वे घडविणार ऐतिहासिक गडकिल्ल्यांची सहल, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार शिवरायांचा वारसा
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला १० दिवसांची पर्यटन सहल रेल्वेमार्फत आयोजित केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फडणवीस आणि रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी बीकेसीतील जियो कन्व्हेशन सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. रेल्वेच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यास मदत होईल, असा विश्वासही या दोघांनी बोलून दाखविला.
विदर्भातील गोंदिया ते बल्हारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल ४,८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व आंध्र प्रदेशशी व्यापार - व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी विक्रमी निधी देण्यात आला असून, याद्वारे १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही समावेश आहे. यावर्षी रेल्वे अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला २३,७०० कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.