पाऊस २५ टक्के, पेरण्या १५ टक्के
By admin | Published: July 8, 2014 01:13 AM2014-07-08T01:13:14+5:302014-07-08T01:13:14+5:30
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १५ टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत.
अमरावती विभाग : सर्वाधिक पेरण्या यवतमाळात, दुबार पेरणीचे संकट
यवतमाळ : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १५ टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत.
७ जूनला मृग नक्षत्र सुरू झाले. एक महिना उलटूनही पावसाचा पत्ता नाही. एरवी या महिनाभरात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पेक्षा अधिक पाऊस नोंदविला जातो. परंतु यावर्षी अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या पाच जिल्ह्यात केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता जुलै महिनाही कोरडाच जातो की काय अशी हूरहूर शेतकऱ्यांसह पाणीटंचाई सामना करणाऱ्या नागरिकांना लागली आहे. विभागात ३२ लाख ८४ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ १५ टक्के अर्थात पाच लाख सात हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ४२ टक्के पेरण्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. स्प्रिंकलर व ड्रीपची सोय नसलेल्या शेतकऱ्यांनीही पेरण्या केल्याने त्या उलटण्याची चिन्हे आहेत. पांढरकवडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. मात्र पावसाने दडी मारली. जमिनीतील ओल आणखी जास्तीत जास्त आठवडाभर टिकू शकणार आहे. त्यानंतर मात्र पिकांचे काहीच खरे नाही. आठवडाभरात पाऊस न आल्यास बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची चिन्हे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)