राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता; २७ व २८ जुलैला पावसात होणार वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 07:52 PM2020-07-25T19:52:25+5:302020-07-25T19:53:51+5:30
कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला.
पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. राज्यातील सर्वत्र हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ व २८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या २४ तासात राज्यात कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तसेच बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला असून मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विदर्भात बुलढाणा, चिखलीसह अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला होता.
शनिवारी दिवसभरात महाबळेश्वर, नाशिक, परभणी, अकोला, अमरावती, गोंदिया तसेच पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अरबी समुद्रावरील वारे हे उत्तरेच्या दिशेने वाहत आहेत. त्यांचे प्रमाण २७ व २८ जुलै रोजी वाढणार आहे. मात्र, त्यावेळी हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे़ २६ जुलै रोजी मध्य भारतात पावसाची व्यापी वाढणार आहे.
२७ व २८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातही या दोन दिवसात पावसाचे प्रमाण वाढणार आहे़ २८ जुलै रोजी विदर्भातील अनेक भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. २८ जुलै रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुण्यात सायंकाळनंतर पावसाची जोरदार हजेरी
शुक्रवारी दिवसभर संततधार पावसानंतर शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. सायंकाळनंतर शहरात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे़ सिंहगड रोड, मुंढवा, केशवनगर, बावधन, हडपसर, चंदननगर भारात पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.