मुंबईसह राज्यभरात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 08:54 AM2017-09-13T08:54:06+5:302017-09-13T08:54:06+5:30
मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.
मुंबई, दि. 13- मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे बळीराजा काहीप्रमाणात सुखावला असून, उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने कमबॅक केलं आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तर अलिबाग, पेण, पनवेल, कर्जतमध्ये ही पावसाच्या सरी बरसत आहेत.पालघरमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतो आहे. कोल्हापूर, नाशिक आणि लातुरातही मुसधळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. बीडमध्येही काल मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं शहरातील सर्व नाले ओसंडून वाहत आहेत. मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस असला तरी त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झालेला नाही. तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचं समजतं आहे.
Maharashtra: Heavy overnight rains lashed Mumbai pic.twitter.com/nPYRRNLKYU
— ANI (@ANI) September 13, 2017
दुसरीकडे उरणमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळते आहे तर विजांचा कडकडाट मात्र कायम आहे. तर मुसळधार पावसाने नवी मुंबईकरांनाही काही प्रमाणात दिलासा दिला आहे. विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस नवी मुंबईमध्ये सुरू आहे. वसई-विरार-मीरा भाईंदरमध्ये पावसाची रिपरिप सुरू असून रायगडमध्ये काही भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. पुढील ३ ते ४ तास मुंबईसह कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडले, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळते आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाची झळ सोसावी लागत होती.पण मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावासानं हवेत गारवा निर्माण झाला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत तुफान पावसानं हजेरी लावली. तब्बल 1 ते दीड तास मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. अजूनही मुंबईतल्या अनेक उपनगरांत पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यामुळे मुंबई गारेगार झालेली पाहायला मिळते आहे. नवी मुंबईतही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसतो आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास विजांच्या कडकडांटासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर कामोठे आणि आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा खंडीत करावा लागला होता.
नाशिकमध्येही काल रात्री विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसाचा जोर पाहता शहरातील अनेक भागांमधला वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गेल्या दोन्ही वेळेस मुसळधार पावसामुळे नाशकात पूरपरिस्थिती ओढवली होती. त्यामुळे आता तिसऱ्यांदाही पावसाचा जोर पाहता नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.