मराठा आरक्षणासाठी निवेदनांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:31 AM2018-05-03T05:31:18+5:302018-05-03T05:31:18+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध संघटना, संस्था आणि व्यक्तिगत स्वरुपाचे १० हजारांहून अधिक निवेदने प्राप्त झाले आहेत
अहमदनगर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध संघटना, संस्था आणि व्यक्तिगत स्वरुपाचे १० हजारांहून अधिक निवेदने प्राप्त झाले आहेत, अशी माहिती राज्य मागासवर्ग आयोगाचे तज्ज्ञ सदस्य डॉ़ सर्जेराव निमसे यांनी येथे बुधवारी पत्रकारांना दिली़ मराठा आरक्षणाबाबतची जनसुनावणी व सर्वेक्षणाचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे निमसे यांनी सांगितले़
बुधवारी येथे जनसुनावणी घेण्यात आली़ आयोगाचे सदस्य डॉ़ दत्तात्रय बाळ सराफ, प्रा़ राजाभाऊ करपे आणि सदस्य सचिव डी़ डी़ देशमुख आदी उपस्थित होते़ निमसे म्हणाले, शासनाने राणे समितीच्या अहवालाचा अभ्यास करणे, माहिती जमविणे, नवीन आकडेवारी उपलब्ध करणे, यासारखी महत्त्वाची माहिती जमविण्यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली आहे़ आयोगाने मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यात जाऊन जनसुनावणी घेतली़ पश्चिम महाराष्ट्राच्या जनसुनावणीला नगरमधून सुरुवात झाली आहे़
विश्वासार्ह माहिती
मराठा आरक्षणासाठी विश्वासार्ह माहिती व पुरावे जमा करण्यावर आयोगाचा भर आहे़ जनसुनावणीरोबरोबरच मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे़ मराठवाडा व विदर्भातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक , नोकरी, घरगुती आणि आर्थिक उत्पन्न, आदींचा समावेश असेल.