कोल्हापूर, सोलापूरसह बीडमध्ये पाऊस

By admin | Published: May 13, 2016 04:49 AM2016-05-13T04:49:44+5:302016-05-13T04:49:44+5:30

वाढत्या उष्म्याने अंगाची लाही-लाही होत असताना गुरुवारी कोल्हापूर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात वळवाचा जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासर झालेल्या पावसाने हवेत गारवा आल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे.

Rain in Beed with Kolhapur, Solapur | कोल्हापूर, सोलापूरसह बीडमध्ये पाऊस

कोल्हापूर, सोलापूरसह बीडमध्ये पाऊस

Next

कोल्हापूर/ सोलापूर/बीड : वाढत्या उष्म्याने अंगाची लाही-लाही होत असताना गुरुवारी कोल्हापूर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात वळवाचा जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासर झालेल्या पावसाने हवेत गारवा आल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर शहरासह शिरोली, एमआयडीसी, नृसिंहवाडी परिसरात जोरदार वाऱ्यासह सुमारे अर्धा तास पाऊस झाला. कोल्हापूरात सायंकाळी पाचच्या सुमारास एकदमच पावसाळी वातावरण झाले. आकाशात काळे ढग दाटून आले. वारे जोराने वाहू लागले. त्यामुळे धुळीचे लोट उसळले. रस्त्यांवरील विक्रेत्यांची धांदल उडाली. पाऊस आला आला...म्हणेपर्यंत टप-टप थेंब पडू लागले; परंतु त्याचवेळी वादळी वारेही तितक्याच जोराने वाहत असल्याने पावसाचा जोर कमी झाला. तरीही सुमारे वीस मिनिटांहून अधिक काळ हलक्या सरी कोसळल्या. पहिल्या पावसात भिजून घेण्याचा आनंद बच्चे कंपनीसह अनेकांनी लुटला.
साताऱ्यात शिडकावा
सातारा शहरात सायंकाळी चारच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला. मंगळवारी महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला.
सोलापुरात जोरदार सरी
सोलापुरात सायंकाळी वळीवाचा जोरदार पाऊस झाला. सोलापूरातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढाच असून गुरुवारी तो ४२.५ अं. से. एवढा होता. सायंकाळी चारनंतर वातावरणात बदल होऊन पाऊस झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बीडला तिसऱ्या दिवशी पाऊस
बीड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी उन्हाचा पारा ४२ अंशावर गेला होता. सायंकाळी पाचनंतर वातावरणात बदल झाला. आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. त्यानंतर पावसाच्या सरी बरसल्या. या पावसाने घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली. रस्त्यावर व सखल भागात पाणी साचले होते. सलग तिसऱ्या दिवशीही आलेल्या पावसामुळे बीड जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.नागपूरपाठोपाठ जळगाव ४४, अकोला ४३.६, परभणी ४२, नांदेड ४२.५ आणि मालेगावला ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.७, कोल्हापूर ३९, महाबळेश्वर ३३.३, नाशिक ३८.२, सांगली ४०.५, सातारा ३९, सोलापूर ४०.५, मुंबई ३३.२, अलिबाग ३२.५, रत्नागिरी ३४.८, डहाणू ३४.६, औरंगाबाद ४०.६, नांदेड ४२.५.

Web Title: Rain in Beed with Kolhapur, Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.